बाँब धमकी : एफबीआय साहाय्य करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून भारतात प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना अज्ञातांकडून इंटरनेटवर मिळणाऱ्या धमक्यांच्या तपासासंदर्भात भारताला अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय साहाय्य करीत आहे. एफबीआय आणि इंटरपोलच्या सहकार्याने भारत अशी धमकी देणाऱ्यांचा शोध घेत आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये 400 हून अधिक धमक्या आल्याने कंपन्यांना विमानांचे अवतरण करावे लागले आहे, किंवा मार्ग बदलावे लागले आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. या प्रकरणी भारतात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. धमकी देऊन विमानसेवा विस्कळीत करण्याचा आंतरराष्ट्रीय कट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने एफबीआयला साहाय्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार एफबीआयने भारताला सहकार्य करण्यास प्रारंभ केला आहे. धमक्यांचे ईमेल कोठून येत आहेत आणि ते कोण पाठवित आहे, याचा शोध त्वरित घेऊन दोषींना न्यायासनासमोर खेचण्याचे मोठे आव्हान भारतासमोर सध्या आहे.
खलिस्तानवाद्यांवर संशय
अमेरिका किंवा अन्य देशांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या खलिस्तावाद्यांकडून हे धमकीचे ईमेल पाठविण्यात येत असावेत, असा संशय आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेला साहाय्याची विनंती केली होती. अमेरिकेचा नागरिक असणारा आणि शीख फॉर जस्टीस या फुटीरतावादी संघटनेचा नेता गुरुपतवंतसिंग पन्नू याने काही दिवसांपूर्वी एअर इंडियावर 1 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या काळात बहिष्कार टाका आणि भारताची अर्थव्यवस्था मोडून काढा, असे आवाहन पेले होते. त्यामुळे खलिस्तानवाद्यांवर भारताचा संशय बळावला असून त्यादृष्टीने तपास होत आहे.
अमेरिकेच्या संस्थांशी संपर्क
या संदर्भात भारताने सातत्याने अमेरिकेच्या अन्वेषण संस्थांशी संपर्क ठेवला आहे. भारतीय विमान कंपन्यांना येणाऱ्या धमक्यांचा परिणाम अमेरिकन प्रवाशांवरही होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा त्वरेने शोध घेणे हे अमेरिकेसाठीही महत्त्वाचे आहे. म्हणून या संस्था साहाय्य करीत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.