बेळगाव न्यायालयात बॉम्बच्या अफवेने तारांबळ
बेळगाव : न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असा ई-मेल पाठविण्यात आल्याने मंगळवारी बेळगाव न्यायालयात एकच तारांबळ उडाली. ही माहिती समजताच श्वानपथक, तसेच बॉम्ब निष्क्रिय पथकाकडून जुन्या आणि नवीन न्यायालयांच्या इमारतांमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत तपासणी करण्यात आली. मात्र कोठेही बाँब किंवा स्फोटक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र बॉम्बच्या अफवेमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला.
गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयासह विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे संदेश पाठविले जात आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी घेत तपासणी करण्यात आली. पण कोठेही बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे केवळ बॉम्बची अफवाच पसरविली जात असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी होळी असली तरीही सर्व शासकीय कार्यालये, तसेच न्यायालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. मात्र बेळगाव न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असा ई-मेल न्यायालयाच्या मेलवर पाठविण्यात आला.
सदर ई-मेल प्राप्त होताच न्यायालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तातडीने श्वानपथक, तसेच बॉम्ब निष्क्रिय पथकांना पाचारण केले. सकाळपासून दुपारपर्यंत न्यायालय परिसर पिंजून काढण्यात आला. खबरदारी म्हणून वकील, पक्षकार न्यायालय आवारातून बाहेर आले. बराच उशीर शोधमोहीम राबवूनदेखील कोठेच स्फोटक वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे बॉम्बची केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.
कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून न आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. मात्र या अफवेमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांचे सहकारी न्यायालय आवारातील सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून हेते. सध्या अमेरिका, इराण, इस्रायल देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे सध्या देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. त्यातच बेळगाव न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल पाठविण्यात आल्याने ही बाब पोलीस खात्याकडून गांभीर्याने घेण्यात आली.
ई-मेल बनावट असल्याचे स्पष्ट
बेळगाव न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल पाठविण्यात आल्याने ही बाब गांभीर्याने घेत तातडीने श्वानपथक व मेटल डिटेक्टर पथके पाचारण करून तपासणी करण्यात आली. मात्र कोठेही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. पण खबरदारी म्हणून पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. बाँब ठेवण्यात आल्याचा ई-मेल बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- भूषण बोरसे, पोलीस आयुक्त