बाँब अफवेने वळविले इंडिगोचे विमान
हैद्राबाद :
तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास सज्ज असणारे इंडिगो या कंपनीचे प्रवासी विमान बाँबच्या अफवेने मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या आसपास एका ईमेलद्वारे विमानात मानवी बाँब असल्याचा संदेश देण्यात आला. त्यामुळे हैद्राबाद विमानतळावरही त्वरित सावधनतेचा इशारा देण्यात आला. इंडिगोचे विमान इशाऱ्यानंतर मुंबईकडे वळविण्यात आले. तेथे ते नंतर सुखरुप उतरल्याची आणि विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर या विमानाची बारकाईने तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ही बाँबची अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. हा बनावट ईमेल कोणी पाठविला, याचा शोध आता घेतला जात आहे. या प्रकरणी प्रवासी विमान प्राधिकरणाने तक्रार सादर केली आहे. मुंबईला उतरविण्यात आलेल्या प्रवाशांना अन्य विमानाने हैद्राबाद येथे आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. अफवेचा ईमेल पोहचताच ‘बाँब धमकी मूल्यांकन समितीची ऑन लाईन बैठक त्वरित आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या ईमेलचा विचार करण्यात येऊन बाँबचा इशारा ‘विशिष्ट’ श्रेणीतील असल्याची घोषणा करण्यात आली.