बेंगळूरमध्ये रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट; आयईडीचा वापर; 9 जण गंभीर जखमी
देशातील आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळूरमध्ये आज बाँबस्फोट झाला असून यामध्ये 9 जण नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. बेंगळूरमधील कुंडलहल्ली परिसरामध्ये असणाऱ्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये हा स्फोट झाला आहे. यासंदर्भातील माहीती कर्नाटकचे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरम्मया यांनी पत्रकारांना दिली आहे. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. जखमी लोकांना ब्रुकफिल्ड रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची तब्येत आता धोक्याबाहेर असल्याचं कर्नाटकचे पोलीस प्रमुख आलोक मोहन यांनी सांगितलं आहे.
बेंगळूरमधील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला असून हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु असून दहशतवादविरोधी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), बॉम्बशोधक पथक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक कॅफेमध्ये पोहोचले असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली. या स्फोटामध्ये सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी)चा वापर करण्यात आल्याचे समजते.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "दुपारी 12.30 च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आली आहे. या कॅफेमध्ये एक बॅग असल्याची माहीती मिळाली असून त्यादिशेने तपास सुरू आहे. आताच मिळालेल्या बातमीनुसार ते आयईडी नावाची स्फोटके होती. तपास यंत्रणाद्वारे अधिक तपास सुरू आहे." असेही ते म्हणाले.
या स्फोटानंतर भाजपचे बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपल्य़ा X वर लिहीलेल्या पोस्टमध्ये, सरकारला धारेवर धरले आहे. "रामेश्वरम् कॅफेचे संस्थापक श्री नागराज यांच्याशी त्यांच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल आत्ताच बोललो....त्यांनी मला माहिती दिली की हा स्फोट एका ग्राहकाने ठेवलेल्या पिशवीमुळे झाला आहे. हा सिलिंडरचा स्फोट नाही....त्यांचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून स्पष्टीकरण द्यावीत." असे खासदार सूर्या यांनी म्हटले आहे.