भोमा येथे पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; 7 जखमी
फोंडा : प्रतिनिधी
फोंडा तालुक्यातील भोमा येथे शनिवारी सकाळी टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात होऊन चालकासह सात प्रवासी जखमी झाले. दावणगिरी, कर्नाटक येथून गोवा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यालगत असलेल्या सातेरी देवीच्या घुमटीवर आदळल्यानंतर रस्त्यावर उलटली. जखमींना तातडीने मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील दावणगिरी येथून 12 जण केए-13-बी-7390 क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून गोवा फिरण्यासाठी आले होते. मोलेहून पणजीच्या दिशेने जात असताना भोमा येथे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सातेरी देवीच्या घुमटीवर जाऊन आदळली. त्यानंतर वाहन रस्त्यावर उलटले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी झालेल्या सात जणांना 108 रुग्णवाहिकेतून मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच म्हार्दोळ आणि फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ फोंडा-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. फोंडा वाहतूक पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा म्हार्दोळ पोलिसांनी केला.
तीन महिन्यांत दुसरा अपघात
भोमा येथील याच ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत दुसरा अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहतुकीसाठी बगल रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे.