बोलोलीच्या केदारलिंग विकास सेवा संस्थेत अपहार ! पीक कर्जात ३ कोटीचा अपहार झाल्याची तक्रार
सहकार निबंधकांच्याकडे शेतकऱ्याची चौकशीची मागणी
सांगरूळ /वार्ताहर
करवीर तालुक्यातील बोलोली येथील श्री केदारलिंग विकास सेवा संस्थेत पीक कर्जात अपहार झाला आहे. शेतकऱ्यांच्या नावे विकास संस्थेतून आकस्मिक व खावटी कर्ज काढून बँकेमध्ये वर्ग करून परस्पर बोगस सह्या करून बँकेतून पैसे उचल केले आहेत. संस्थेतील कर्ज प्रकरणात (डिमांड) सुमारे तीन कोटीचा अपहार झाला आहे .अशी लेखी तक्रार ऊस उत्पादक सभासद सुनील बाटे यांनी उपनिबंधक कार्यालयात केली आहे. संस्थेतशेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक कर्ज काढून परस्पर पैसे उचलल्याची माहिती मिळताच अनेक सभासदानी संस्थेकडे धाव घेतली असून हा अपहाराचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.या अपहाराची माहिती परिसरात पसरतातच बोलोली सह बारा वाड्या मधून खळबळ उडाली आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम टोकाला बोलोली हे ग्रुप ग्रामपंचायतचे गाव आहे .या गावासह परिसरातील बारा वाड्या कार्यक्षेत्र असलेली श्री केदारलिंग सेवा संस्था आहे .
संस्थेमध्ये ८०० सभासद असून ४५० पीक कर्जदार आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर एक टन ऊस जात नाही. अशा शेतकऱ्यांना २० ते २५ लाख कर्जाला मंजुरी दिली आहे. संस्थेच्या सचिवांनी पीक कर्ज , खावटी , व आकस्मित कर्ज बँकेत परस्पर वर्ग करून , बँकेत सभासदांच्या सहया पाहून, बोगस सहया मारून स्वतः पैसे काढले आहेत. व स्वतःच वापरले आहेत. संस्थेच्या सचिवांनी मेंबर कर्ज टाकून, हात शिल्लक कमी करणे व हात शिल्लक स्वतः कायम वापर करून तीन वर्षात बँकेत रोखीने भरणा केलेला नाही. संस्था तोट्यात असताना सभासदांना खुश करण्यासाठी सचिवानी लाभांश वाटप केलेला आहे. सरळ व्याज जमा करून घेऊन येणे व्याज दाखविले आहे. कर्ज मंजुरी एकाची, डिमांड एकाला, मेंबर कर्ज दुसऱ्याच्या नावे टाकले आहे. रोखीने केलेल्या जमा पावत्या, कर्ज खात्यात जमा न धरता, सचिव व बँक निरीक्षक यांनी बोगस जिंदगी दाखवून सभासदांचे नावे कर्ज मंजुरीत वाढ केलेली आहे. सभासदांच्या नावे कर्जरोखे घेतलेले नाहीत. सचिव व तेथील संबंधित क्लार्कने पीक कर्ज, खावटी कर्ज ,आकस्मित कर्ज ,बँकेत वर्ग करून बँकेत सहीचा नमुना पाहून सभासदांच्या बोगस सह्या करून सभासदांचे नावे रकमा उचललेल्या आहेत. तरी मला व संस्थेच्या सभासदांना योग्य तो न्याय मिळावा ,याबाबत जिल्हा उपनिबंधक, जिल्हा लेखा परीक्षक, विशेष वर्ग एक लेखापरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
हेड क्लार्क कारभारी
संस्थेच्या संचालकांनी ठराव घालून हेड क्लार्ककडे संस्थेचा .सर्व कारभार सोपविला आहे. येणे देणे सर्व कामकाज तेच पाहत होते. यामध्ये सचिव, अध्यक्ष, संचालकांच्या व सभासदांच्या बोगस सह्या करून परस्पर बँकेतून पैसे उचल केले असून भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत ऑडिट सुरू केले असता कॉम्प्युटरची डिमांड फाईल त्यांनी डिलीट केली आहे. बँकेमध्ये माहिती मागविली असता गेली १५ दिवस बँकेत हेलपाटे मारूनही माहिती देण्यास टाळा टाळ केली आहे.-जोतीराम कारंडे सचिव
सचिवाची चौकशी व्हावी
सचिव जोतीराम कारंडे यांनी माझ्या नावे २७ जून २०२३ रोजी आकस्मिक व खावटी कर्जापोटी जिल्हा बँकेच्या आमशी शाखेत दोन वेळा पैसे पाठवून साठ हजार रुपये जमा केले व बोगस सहया करून पैसे उचलले आहेतआहेत शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलून कोट्यावधी रुपयाची मालमत्ता गोळा केली आहे .बोगस कर्जाबाबत तक्रार केली असता माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे . चौकशी करून सचिवावर कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे. सुनील बाटे- शेतकरी
सेवा संस्था कुणाच्या विकासासाठी
ग्रामीण भागातील शेतकऱ्याला सुलभ कर्ज उपलब्ध व्हावी म्हणून सहकारी सेवा संस्थांच्या स्थापना गावोगावी झाले आहेत . सभासद हे संस्थेचे मालक समजले जातात .पण अलीकडच्या काळात सेवा संस्थांच्या मधून काही सचिव व काही कारभारी संचालक शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस कर्ज टाकून परस्पर पैसे उचलून स्वतःच्या व्यवसायामध्ये वापरत आहेत . झटपट श्रीमंत होण्याच्या नादात असे प्रकार घडत आहेत . यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्याकडेही संशयाच्या नजरेने पाहत आहेत .