बॉलिवूडचा पहिला अॅक्शन हीरो
लिजंड आणि सुपरस्टार असलेले धर्मेंद्र हे काही दिवसांपूर्वी जेव्हा आजारी पडले तव्हा पूर्ण देशातील चित्रपटप्रेमी त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसून आले. धर्मेंद्र यांच्याविषयी कुठल्याही चित्रपटप्रेमीच्या बोलण्यात आपुलकी, एकप्रकारची आत्मियता जाणवते.
नव्या हीरोची एंट्री
धर्मेंद्र यांची चित्रपटसृष्टीतील एंट्री 1950 च्या दशकाच्या अखेरीस झाली. त्या काळात राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत होते. परंतु त्या सर्वांचा स्वत:चा असा एक झोन होता, राज कपूर यांच्या चित्रपटात सामाजिक संदेशाचा बोलबाला होता. दिलीप कुमार यांच्या मनोरंजनाचा ब्रँड गंभीर होता, ते ट्रेजेडी किंग ठरू लागले होते. देव आनंद एक शहरी शैली असलेले स्टायलिश हीरो होते. या त्रिकुटाचा चित्रपट, स्वातंत्र्याच्या काळात पाहिली गेलेली स्वप्ने आणि आकांक्षांच्या वेगवेगळ्या बाजू दाखविणारा असायचा. परंतु स्वत:ची नवी ओळख तयार करत देश उद्योग अणि पुढे जाण्याच्या हालचालींवर लक्ष देत होता. त्या काळात लोकांना चित्रपटात आदर्शवाद, सामाजिक संदेशांची लेक्चरबाजी आणि ड्रामापेक्षा मनोरंजनाचा शोध होता. अशा काळात धर्मेंद्र यांची एंट्री झाली आणि त्यांनी तीन दिग्गज अभिनेत्यांदरम्यान स्वत:चे स्थान निर्माण केले. मेहनती, संतापणारा आणि खुलून हसणारा नायक त्यांनी प्रेक्षकांसमोर साकारला. हा हीरो आदर्श नायक नव्हता, तर सामान्यांचा प्रतिनिधी होता.

पहिला मास हीरो
1950-60 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टी प्रामुख्याने शहरी धाटणीची होती. हीरो कोट-पँट परिधान करायचे, त्यांच्या बोलण्यात इंग्रजी शब्द डोकावत आणि ते मोठ्या शहरांमध्ये राहत होते. परंतु धर्मेंद्र स्क्रीनवर आल्यावर त्यांच्यासोबत मातीचा गंधही आला. ही एक प्रकारची ग्रामीण वस्तुस्थिती होती, ज्याचा चेहरा धर्मेंद्र होते. ‘मेरा गांव मेरा देश’, ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘धरमवीर’ यासारख्या चित्रपटांमधील त्यांचा ग्रामीण बाज नकली वाटत नव्हता. तो त्यांचा सहज स्वभाव होता. त्यांची देहबोली, संवादफेक आणि वावरण्यात खरा भारत दिसून यायचा. धर्मेंद्र येण्यापूर्वी चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन डेकोरेशन होते. धर्मेंद्र यांनी याला भावनेची जोड दिली. पूर्वी अॅक्शन केवळ स्टंट होता. धर्मेंद्र आल्यावर तो अन्याय करणाऱ्यांवर दंड ठरला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मजबूत शरीरासोबत ही अॅक्शन समर्पक वाटायची. इमोशन्ससोबत मिळून त्यांनी अॅक्शनला मानवतेची जोड दिली. त्यांचा हीरो हिंसा करत होता, परंतु अन्यायाला न्यायात बदलण्यासाठी. हा धर्मेंद्र यांचा ‘गरम-धरम’ अवतार होता. ‘फूल और पत्थर’द्वारे त्यांची ही शैली सुरू झाली, मग ‘याद किसी की आती है’, ‘इज्जत’, ‘शिकार’ आणि ‘आंखें’ आणि त्यानंतर ‘मेरा गांव मेरा देश’पर्यंत पोहोचली. इंडियन सिनेमात ‘मास सिनेमा’ शब्द शिरला नव्हता, तेव्हा धर्मेंद्र हे खरे मास हीरो ठरले होते. चित्रपटप्रेमींच्या एका पूर्ण पिढीसाठी धर्मेंद्र हे मोठ्या पडद्यावरील पहिले यंग हीरो होते.
परिपूर्ण हीरो पॅकेजची सुरुवात
‘दिली भी तेरा हम भी तेरे’, ‘शोला और शबनम’, ‘अनपढ’ आणि ‘बंदिनी’ यासारख्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र हे सॉफ्ट रोमँटिक भूमिकेत होते. ‘सत्यकाम’, ‘मंझली दीदी’ आणि ‘अनुपमा’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांची गंभीर अभिनयाची क्षमता दिसून आली. अॅक्शनमध्ये त्यांचा कुणीच हात धरू शकला नाही. तर कॉमिक टायमिंग इतके नैसर्गिक होते की सीरियस ड्रामा चित्रपटांमध्ये एका वाक्याने वातावरण निर्माण व्हायचे. नंतर ही क्षमता ‘चुपके चुपके’ या विनोदी चित्रपटातही सिद्ध झाली.

पुरुषी सौंदर्याचे आयकॉन
1997 च्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये दिलीप कुमार यांनी धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देताना ‘अल्लाहने मला धर्मेंद्र इतके हँडसम का केले नाही’ असे उद्गार काढले होते. तर सलमान खानने एकदा धर्मेंद्र यांना ‘सर्वात सुंदर पुरुष’ संबोधिले होते. माधुरी दीक्षितचेही हेच मानणे होते. धर्मेंद्र यांनी शिक्षणदशेपासूनच अखाड्यात जात स्वत:चे शरीर कमाविले होते. त्यांच्यापूर्वीच्या तसेच सोबतच्या अन्य अभिनेत्यांकडे सुंदर चेहरा होता, परंतु धर्मेंद्र यांच्यासारखे कमाविलेले शरीर नव्हते. महिलांसाठी ते क्रश होते. सौंदर्याचा सन्मान कॅमेऱ्यावर केवळ महिलांसाठी राखीव होता, धर्मेंद्र यांनी ही भिंत तोडत पुरुषी सौंदर्यासाठी दरवाजा केला. यामुळे पुढील काळात सनी देओल, संजय दत्त, सलमान खान आणि मग पूर्ण एका पिढीने पिळदार शरीराद्वारे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळविली.