मालदीवच्या कोणत्याही बेटांवर बॉलीवूडचे शूटींग करू नका; सिने कामगार संघटनेचे चित्रपट निर्मात्यांना इशारा
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) या भारतीय चित्रपट कर्मचाऱ्यांच्या संघटनेने चित्रपट निर्मात्यांना मालदिवच्या बेटांवर कोणत्याही प्रकारचे चित्रिकरण करू नका असा इशारा दिला आहे. मालदीवच्या काही मंत्र्यांनी केलेल्या भारतविरोधी वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल यांनी एका व्हिडिओद्वारे हा संदेश दिला आहे.
गेले काही दिवस भारत सरकार आणि मालदिव सरकार यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हायरल झालेल्या फोटोनंतर मालदीवच्या मंत्र्यांकडून भारतविरोधी वक्तव्य करण्यात आली त्यामुळे या वादामध्ये आणखीणच भर पडली आहे. या वादामध्ये आता भारतीय चित्रपट कामगार सेनेनेही उडी घेतली आहे. मालदिवमध्ये बॉलीवूडच्या बऱ्याच चित्रपटांचे चित्रिकरण केले जाते. यातून मालदिवला चांगला महसूल मिळतो. त्यामुळे आता कामगार संघटनेने आपल्या चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठी मालदिवला न जाण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या जारी केलेल्या व्हिडीओत बोलताना सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल म्हणाले, “मालदीव सरकारने भारत सरकारला 15 मार्चपर्यंत त्यांच्या बेटांवरून भारतीय सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी मालदीवच्या काही मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरले होते. यानंतर भारतात मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी भारतीय चित्रपट उद्योगाला आवाहन करतो की त्यांनी मालदीवमध्ये चित्रपटांचे शूटिंग करू नये. तसेच कोणीही आपल्या सुट्टीमध्ये मालदीवमध्ये जाऊ नये. ” असे आवाहन सुरेश श्यामलाल यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, "मालदीवशी संबंधित कोणतीही पोस्ट तुम्ही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकू नका...भारतातही अनेक सुंदर बेटे आहेत...तुम्ही आपल्या चित्रिकरणासाठी त्यांचा वापर करा. जो कोणी देशाच्या विरोधात जाईल...आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ. आम्ही काहीही सहन करू शकतो परंतु आपल्या देशाच्या विरोधात बोललेलं कधीच सहन करणार नाही.”