बॉलिवूड अभिनेत्रीला हवीय मदत
बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील कलाकारांकडे काम नसल्याचे वृत्त अनेकदा समोर येत असते. मनोरंजनाच्या क्षेत्रात कधी कोण राजा ते रंक आणि रंक ते राजा होईल काही सांगता येत नाही. आता एका प्रख्यात अभिनेत्रीने काम नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मला काम मिळवून द्यावे, अशी विनंती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. या अभिनेत्रीचे नाव संध्या मृदुल असून तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
पेज 3 आणि हनीमुन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम पेलेल्या संध्या मृदुलने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या मी अत्यंत अवघड काळाला सामोरी जातेय. माझ्याकडे काम नाही तसेच पैसे देखील नाहीत. लोक सध्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्सना अधिक महत्त्व देतात. फॉलोअर्स नसतील तर काम मिळत नाही. परंतु कामच मिळाले नाही तर कुणाला प्रसिद्धी कशी मिळणार? मग फॉलोअर्स कुठून येणार? ही अत्यंत गोंधळाची स्थिती आहे. माझ्याकडे पूर्वी जे काम होते, ते देखील आता नाही. कारण माझ्याकडे अधिक फॉलोअर्स नाहीत. फॉलोअर्स नसल्याने काम मिळत नसल्याचे माझा मॅनेजर सांगतोय. याचमुळे मदत करा अशी विनंती करत असल्याचे संध्याने म्हटले आहे.