बोलिव्हीयाचे विमान कोसळून 16 ठार
वृत्तसंस्था / ला पाज
नव्या नोटा वाहून नेणारे बोलिव्हिया या देशाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. 30 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोलिव्हियाची राजधानी ला पाज येथील विमानतळावरुन टेक ऑफ करताना हे विमान धावपट्टीवरुन घसरले आणि नजीकच्या महामार्गावर जाऊन पोहचले. या विमानाने महामार्गावरच्या अनेक गाड्यांना चिरडले. विमानात प्रवाशांची संख्या विशेष नव्हती. मात्र, विमानाखाली आलेल्या गाड्यांमधील अनेक लोक या अपघातात मृत्यूमुखी पडले. हे विमान बोलिव्हियाच्या वायुदलाचे होते.
विमान महामार्गावरुन एका शेतात घसरल्यानंतर त्याचे तुकडे झाले. विमानात ठेवलेल्या नव्या नोटांचे गठ्ठे विमानाबाहेर सांडले. त्यामुळे नोटा उचलण्यासाठी विमानाभोवती असंख्य लोकांची गर्दी झाली होती. विमानाला आग न लागल्याने नोटा सुरक्षित राहिल्या. त्यामुळे अनेकांनी त्या लुटून नेल्या, अशी माहिती देण्यात आली आहे. बोलिव्हिया सरकारने आता या नोटांचा शोधास प्रारंभ केला आहे.