बोलिवियाकडून इस्रायलसोबतचे संबंध संपुष्टात
कोलंबिया-चिलीने परत बोलाविले राजदूत
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल-हमास युद्धादरम्यान दक्षिण अमेरिकन देश बोलिवियाने इस्रायलसोबतचे राजनयिक संबंध संपुष्टात आणले आहेत. तर कोलंबिया आणि चिली या देशांनी गाझामधील नागरिकांच्या मृत्यूची निंदा करत स्वत:च्या राजदूतांना तेल अवीवमधून परत बोलाविले आहे.
गाझामध्ये होत असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यांची आम्ही निंदा करतो. याचमुळे आम्ही इस्रायलसोबतचे राजनयिक संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचे बोलिवियाचे उपविदेशमंत्री फ्रेडी मामानी यांनी म्हटले आहे. बोलिवियाने दहशतवाद आणि इराणसमोर गुडघे टेकले आहेत असे प्रत्युत्तर इस्रायलने दिले आहे.
युद्ध सुरू झाल्यावर इस्रायलसोबतचे राजनयिक संबंध संपुष्टात आणणारा बोलिविया हा पहिला देश ठरला आहे. परंतु बोलिवियाने पहिल्यांदा अशाप्रकारचे कृत्य केलेले नाही. 20096 मध्ये देखील गाझावर झालेल्या हल्ल्यांवरून बोलिवियाने इस्रायलसोबतचे संबंध तोडले होते. 2020 मध्ये पुन्हा दोन्ही देशांदरम्यान संबंध प्रस्थापित झाले होते.
गाझाला मदत पाठविणार
या निर्णयामुळे बोलिविया हमासच्या दहशतवादाचे समर्थन करत असल्याचे स्पष्ट होते. हमासच्या दहशतवादी हल्लयात 1400 हून अधिक निर्दोष इस्रायली नागरिक मारले गेले असून 200-250 लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे इस्रायलने बोलिवियाला सुनावले आहे. तर दुसरीकडे बोलिवियाने गाझाला मदत पोहोचविण्याची देखील घोषणा केली आहे. हमासने बोलिवियाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
चिलीकडून आरोप
चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. इस्रायलचा हल्ला हा पॅलेस्टिनी लोकांचा नरसंहार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. अरब देशांबाहेर पॅलेस्टिनींचा सर्वात मोठा समुदाय चिलीमध्ये असल्याचे मानले जाते.