नरसिंहगावजवळ बोलेरो गाडी पलटली
कवठेमहांकाळ :
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नरसिंहगांव व कुची गावांच्या दरम्यान झालेल्या अपघातात बोलेरो गाडी डिव्हायडरला धडकून पलटी झाली. बागेवाडी, तालुका जत येथून जात असताना ही घटना घडली. या अपघातात गाडीतील चौघेजण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी कि, रत्नागिरी ते नागपूर हायवेवर बोलेरो गाडी गाडी क्रमांक एम एच १० बी एम ७५४१ वेगाने जात असताना नरसिंहगाव ते कुची रस्त्यालगत असणाऱ्या डिव्हायडरला धडकली. यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले आणि गाडी पलटली. हा अपघात सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये जखमी केशव काशीराम पडूळकर (वय ३५), मंगल काशीराम पडूळकर (वय ५५), रियांश नंदकुमार पडूळकर (वय ४) आणि गाडी चालक बापू बबन शिवशरण (वय २३) यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. नागरिकांनी जखमींना १०८ अॅम्बुलन्सने मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस आणि नॅशनल हायवे पोलीस पोहोचले असून, त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मात्र, या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.