चोर्लानजीक बोलेरो व्हॅन पलटी : वाहतूक ठप्प
खड्डे चुकवताना बोलेरो भररस्त्यावरच पलटी : रस्ता मोकळा करण्यात अडचणी
खानापूर : बेळगाव गोवा रस्त्यावर चोर्लानजीक बोलेरो पिकअप व्हॅन पलटी झाल्याने या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या तीन तासापासून वाहतूक ठप्प झाल्याने बेळगाव चोर्ला रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही पोलीस रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बेळगावहून गोव्याकडे चाललेली के 23 बी 63 53 ही बोलेरो पिकप व्हॅन खड्डे चुकवताना मोठ्या खड्ड्यात जाऊन समोरुन येणाऱ्या बसला धडकल्याने बोलेरो व्हॅन रस्त्यावर पलटी झाली.
व्हॅन रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. अपघात रात्री सातनंतर झाल्याने तसेच जोरदार पाऊस सुरू असल्याने रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात अडचणी येत आहेत. दोन्हीकडे वाहतूक ठप्प झाल्याने टोईंग व्हॅनही घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पोलीस पिकअप व्हॅन बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव चोर्ला रस्त्यावरून गेल्या काही दिवसापासून अवजड वाहतूक होत असल्याने पावसाळ्यापूर्वी दुऊस्त करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. या रस्त्यावरील संपूर्ण अवजड वाहतूक बंद केली होती. मात्र, खानापूरमार्गे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने नुकताच पॅचवर्क केलेला रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.