सोनोलीत भरदिवसा धाडसी चोरी
घराच्या कट्ट्यावर बसलेल्या वृद्धेला लुटले : 12 लाखांचा ऐवज लुटला
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
घराबाहेर बसलेल्या एकाकी वृद्धेला चाकूचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविल्याची घटना सोमवारी दुपारी सोनोली, ता. बेळगाव येथे घडली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेने ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
पुंडलिक झंगरुचे यांच्या घरी ही घटना घडली आहे. पुंडलिक यांची काकू लक्ष्मी नारायण झंगरुचे (वय 75) या वृद्धा सोमवार दि. 20 जुलै रोजी दुपारी आपल्या घरासमोरील कट्ट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी दोन तरुण घरात आले. घरात कोणी नाहीत का? अशी विचारणा करण्यात आली. सगळे शेताला गेलेत, असे वृद्धेने सांगताच एकाने वृद्धेच्या गळ्याला चाकू लावला तर दुसरा घरात शिरला.
कपाटातील 5 तोळे सोने, लक्ष्मी यांच्याजवळील 3 तोळे सोन्याचे दागिने, 20 तोळे चांदीचे दागिने व 50 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
घटनास्थळापासून सुमारे 200 फूट अंतरापर्यंत जाऊन श्वान घुटमळले. एकाकी वृद्धेला चाकूचा धाक दाखवून लुटणारे माहीतगार आहेत का? याचीही चौकशी करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यापासून केवळ 100 फूट अंतरावर पुंडलिक यांचे घर आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने पळविणारे चोरटे कोण? याचा वैज्ञानिक पद्धतीनेही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरटे स्थानिक आहेत की बाहेरील? याची पडताळणी करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.