Manglwedha Crime | मंगळवेढ्यात मध्यरात्री 'गॅस कटर'चा थरार! ७ लाख ७२ हजारांची रोकड लंपास; शहरात खळबळ
शनिवार पेठेत एटीएम फोडून लाखोंची चोरी
मंगळवेढा -मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील माळी गल्ली परिसरात असलेल्या स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ७ लाख ७२ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे शहरातएकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलमान्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी भिकाजी संभाजी लिमकर (वय ४५. व्यवसाय खासगी नोकरी, असिस्टंट मॅनेजरसीएमएस इन्फो प्रा. लि. कंपनी रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०७ मे रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंगळवेढ्यातील माळी गल्ली, शनिवार पेठ येथील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएम आयडी टी १ बीएस ०००४४६०३३ असलेल्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला.
एटीएम रूमचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी आत प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून फोडले. यानंतर मशीनमधील रोकड असलेले ट्रे चोरून नेण्यात आले.चोरीस गेलेल्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या १३३२ नोटा म्हणजे ६ लाख ६६ हजार रुपये तसेच १०० रुपयांच्या १०६९ नोटा म्हणजे १लाख ६ हजार ९०० रुपये असा एकूण ७ लाख ७२ हजार ९०० रुपयांचा समावेश आहे.
दरम्यान, गॅस कटरच्या वापरामुळे लागलेल्या आगीत एटीएम मशीन, एसी आणि सीसीटीव्ही कॅमेरे जळून मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पिसे करीत आहेत.