वास्कोत फ्लॅटवर धाडसी दरोडा
आठ चोरट्यांच्या सशस्त्र टोळीने लुटला लाखोंचा ऐवज, कुटुंबीयांना मारहाण,तोंडात बोळा कोंबून बांधले,पहाटेची घटना, कुटुंब प्रमुख सागर नायक गंभीर जखमी
वास्को : वास्को बायणातील ‘चामुंडी आर्केड’ या बहुमजली इमारतीतील फ्लॅटवर सशस्त्र चोरट्यांनी मंगळवारी पहाटे धाडसी दरोडा घालून सोने-चांदी व रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लुटला. कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून आणि बांधून घालून अज्ञात टोळीने हा दरोडा घातला. या टोळीत सात ते आठ चोरटे होते. चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झाल्याने घरमालक सागर नायक यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या टोळीने नायक यांच्या पत्नी व मुलीलाही जखमी केले व 80 वर्षीय वृद्ध महिलेलाही खाली पाडले. सुदैवाने ती वाचली. म्हापशातील लुटीनंतर लगेच वास्कोत घडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे गोव्यात पुन्हा खळबळ उडाली आहे आणि पोलिस यंत्रणेची झोप उडाली आहे.
म्हापशात हल्लीच घडलेल्या एका बंगल्यातील पन्नास लाखांच्या ऐवजाच्या लुटीचा यशस्वी तपास लागलेला नसतानाच काल मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास वास्कोतील बायणा भागातील एका प्रशस्त फ्लॅटवर सशस्त्र टोळीने दरोडा घातला. सदर फ्लॅट बायणातील प्रसिद्ध चामुंडी आर्केडमध्ये सहाव्या मजल्यावर आहे. इमारतीच्या मागच्या बाजूने ते चोरटे सहाव्या मजल्यापर्यंत लिफ्टचा वापर करून गेले व खिडकीचे ग्रिल्स तोडून स्वयंपाक घरात शिरले. त्यानंतर त्यांनी साखर झोपेत असलेल्या सागर नायक कुटुंबाला त्यांचा बॅडरूम तोडून उठवले. त्यामुळे अशा प्रकाराला कधी सामोरे जावे लागेल असा विचार न केलेल्या नायक कुटुंबाची भीतीने गाळण उडाली.
दरोडेखोर सशस्त्र होते. त्यांच्या हातात लोखंडी व अॅल्युमिनियमचे रॉड होते. लाठ्याही होत्या. प्रथम त्यांनी भीती दाखवण्यासाठी सर्वांना लाठीने मारहाण केली. लाथा बुक्क्यांनीही मारहाण करीत तिजोरीच्या चाव्या देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. अन्यथा चाकूने भोसकून खून करण्याची धमकी त्यांनी नायक यांना दिली. मात्र, तरीही नायक यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. जुमानत नसल्याचे पाहून त्या टोळीने त्यांना अधिकच मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर रॉडने वार करण्यात आल्याने ते रक्तबंबाळ झाले. या मारहाणीतून सागर नायक यांच्या पत्नी हर्षा व मुलगी नक्षत्रा सुटू शकली नाही. मारहाणीत त्यांनाही जखमा झाल्या. घरात सागर नायक यांच्या वृद्ध मातोश्री कॉटवर झोपल्या होत्या. त्या आजारी आहेत. चोरट्यांनी त्यांनाही खाटीवरून खाली पाडले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. सागर नायक हे नुकतेच एमपीटीमधून निवृत्त झालेले साठ वर्षीय गृहस्थ आहेत. याच इमारतीच्या तळ मजल्यावर त्यांचा व्यवसायही चालतो.
थरकाप उडवणारा अर्धा तास अन् सोने, चांदीसह लाखोंची लूट
आपल्या फ्लॅटवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याची माहिती देताना हर्षा नायक यांनी सांगितले की, मारहाण आणि लुटीचा प्रकार जवळपास अर्धा तासाचा होता आणि प्रकार थरकाप उडवणारा होता. जीवावरील धोका ओळखून आपण त्यांना कुणाचाही जीव घेऊ नका, हवे ते घेऊन जा अशी विनवणी केली. आपल्या अंगावरील बांगड्या व अंगठ्या व इतर दागिने त्यांना दिले. देवघरातील चांदीची भांडीही त्यांनी लुटली. दिवाळीनिमित्त तसेच पुढील एका धार्मिक उत्सवानिमित्त सोन्याचे दागिने घरीच ठेवण्यात आले होते, असे हर्षा यांनी सांगितले. तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती दिल्यानंतर त्यांनी तिजोरी लुटली व घरातील रोखही लुटली. या दरोड्यात लुटला गेलेल्या निश्चित ऐवजाविषयी नायक कुटुंबाने तसेच पोलिसांनी अधिकृत माहिती उघड केलेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लुटीचा आकडा जवळपास पन्नास लाखांच्या घरात आहे.
नायक कुटुंबीयांची कार घेऊन पसार होण्याची दरोडेखोरांची योजना होती. त्यांनी त्यांच्या कारची चावी घेतली होती. परंतु फ्लॅटमधून घाईगडबडीत बाहेर पडताना ते चावी विसरले. ती पुन्हा मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.
ओरडू नये म्हणून तोंडात बोळे कोंबून बांधले
आम्ही ओरडण्याचा प्रयत्न करू नये यासाठी त्यांनी आम्हा सर्वांना तोंडात बोळा कोंबून बांधून घातले. त्यानंतर तीन वाजून पाच मिनिटांनी त्यांनी पलायन केले. जाताना त्यांनी मुख्य दरवाजाला बाहेरून कडी घातली. तसेच शेजारच्या फ्लॅटच्या दरवाजानाही बाहेरून कड्या लावल्या. चोरटे गेल्यानंतर मुलीने कशीबशी आपली व सर्वांची सुटका केली आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून दुसऱ्या फ्लॅटच्या आवारात उडी घेतली व तिने आपल्या काकांना व शेजाऱ्याना उठवले. घडला प्रकार सांगून शेजाऱ्यांच्या मदतीने चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या सागर नायक यांना चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पत्नी व मुलीवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. मात्र, सागर यांना गोमेकॉमध्ये हलवण्यात आले. तिथे ते उपचार घेत आहेत.
टोळीला इमारत, फ्लॅट व परिसराची माहिती असल्याचा संशय
सकाळी या दरोड्याची माहिती बायणात पसरल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पहाटेपासूनच चोरट्यांच्या शोधासाठी धावपळ सुरू केली. हर्षा नायक यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सदर टोळीत सात ते आठ ऐन पंचवीशीतील युवकांचा समावेश होता. त्यांनी तोंडावर मास्क व डोक्यावर हेल्मेट घातले होते. ते बिहारी पद्धतीच्या हिंदी भाषेतून बोलत होते. इमारतीबाबत व फ्लॅटबाबत पूर्ण माहिती त्यांना असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. डीआयजी वर्षा शर्मा, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व चौकशी केली. श्वान पथक व फॉरेन्सीक पथकही घटनास्थळी होते. आमदार संकल्प आमोणकर यांनीही नायक कुटुंबाची भेट घेऊन चौकशी केली. आमदार दाजी साळकर यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी सागर नायक यांची भेट घेतली. पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा व पोलिस उपअधीक्षक गुरूदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगांव पोलिस या दरोडा प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
इमारतीला रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक नसणे सशस्त्र टोळीला सोयीचे ठरले
विशेष म्हणजे चोरट्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसू नये यासाठी या इमारतीच्या शेजारच्या इमारतीच्या कुंपणावरून मागच्या बाजूने प्रवेश केला. त्यामुळे त्या टोळीने या परिसराची बरीच माहिती मिळवली होती, असे दिसून येते. इमारतीला सुरक्षारक्षक आहे. परंतु या सुरक्षारक्षकाची ड्युटी सकाळी 9 ते रात्री 9 अशी असल्याने त्या टोळीला दरोडा घालून पसार होणे अधिक सोयीस्कर ठरले.
बायणा दरोडा प्रकरणावर पोलिस सक्रिय,पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांची माहिती
बायणा सशस्त्र दरोडा प्रकरणासंबंधी पोलिस सक्रियपणे कार्यरत आहेत आणि लवकरच नाईक कुटुंबावर झालेल्या हिंसक हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करतील, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) वर्षा शर्मा यांनी दिली. पोलिस बायणा दरोडा प्रकरणावर काम करीत आहेत. आम्हाला थोडा वेळ द्या, संशयितांची ओळख पटेल, असे शर्मा म्हणाल्या, पोलिसांनी मागील दोन दरोड्यांचाही यशस्वीरित्या उलगडा केला आहे. आम्ही हे प्रकरण सोडवण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करू. मी हे एक आव्हान म्हणून स्वीकारत आहे, असे त्या म्हणाल्या. पोलिस पथके सध्या सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत, मिळत असलेल्या माहितीवर अभ्यास करीत आहेत आणि तपासाचा भाग म्हणून गुप्तचर विभागाशी समन्वय साधत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
सांताक्रूझ येथेही घरफोडी,दागिने, रोख रक्कम मिळून 25 लाखांचा ऐवज लंपास
बायणा येथे घातलेल्या सशस्त्र दरोड्याचे प्रकरण ताजे असतानाच सांताक्रूझ येथे भर दिवसा एका घरात चोरट्यांनी दरोडा घालून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून सुमारे 25 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यांतील चार मोठे दरोडे झाले असल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. राज्यात इफ्फीसारखा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार असल्याने देश-विदेशातील लोक गोव्यात येत आहेत. अशाच वेळी दरोड्यांचे प्रकार सुऊ झाल्याने पोलिसांची आणि सरकारची नामुष्की झाली आहे. एाल्ड गोवा पोलिसांनी याबाबत तक्रार नोंद केली असून घटनेचा पंचनामा केला आहे. काही सुगावे पोलिसांच्या हाती लागले असून संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी दिली आहे.