ऑस्ट्रेलियाच्या पीएम संघात बोलॅन्डचा समावेश
वृत्तसंस्था / पर्थ
30 नोव्हेंबरपासून कॅनबेरा येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियन पीएम (पंतप्रधान) इलेव्हन आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन दिवसांच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅन्डचा समावेश करण्यात आला आहे.
यासामन्यासाठी ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन संघाचे नेतृत्व न्यूसाऊथ वेल्सच्या अष्टपैलु जॅक एडवर्डसकडे सोपविण्यात आले आहे. रोहीत शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल.ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटी रोहीत शर्मा खेळू शकला नाही. रोहीत ऑस्ट्रेलियात येत्या सोमवारपर्यंत दाखल होणार आहे. बॉर्डर- गावसकर चषक कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी अॅडलेड येथे 6 डिसेंबरपासून खेळविली जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला या दोन दिवसांच्या सामन्यात सरावाची संधी उपलब्ध होईल. या दोन दिवसांच्या सामन्याला क्रिकेट शौकिनांकडून चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट शौकिनांना या सामन्यात कोहली, बुमराह, पंत यांचा खेळ पाहण्याची संधी लाभणार आहे.
ऑस्ट्रलियन पीएम इलेव्हन संघ : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), अॅन्डर्सन, बीयर्डमन, बोलॅन्ड, क्लेटॉन, ओकॉनर, डेव्हीस, गुडविन, हार्पर, जेकॉब्ज, कोनस्टास, पोप, रेनशॉ आणि जेम रेयान