For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बोजवारा

11:12 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बोजवारा
Advertisement

तोकड्या कर्मचारी संख्येमुळे अनेक विभाग बंद : नागरिकांची गैरसोय

Advertisement

बेळगाव : कॅम्प येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सर्व कामे रखडली जात आहेत. कार्यालयातील अनेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यरत असल्याने अनेक विभाग बंद ठेवावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एखाद्या साध्या फाईलसाठी 8 ते 10 दिवस कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या निवडणुकीचा काळ असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनेक कर्मचारी या कामामध्ये गुंतले आहेत. आधीच कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना त्यातच आता निवडणुकीसाठी कर्मचारी पाठविण्यात आल्याने सर्व कामे रखडली जात आहेत. वाहनांचे नूतनीकरण, वाहन परवाने, परवान्यांचे नूतनीकरण, नवीन वाहनांची नोंदणी, वाहनांचे स्थलांतरण यासह इतर कामांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात ये-जा करावी लागते. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यालयाचे कामकाज संथगतीने सुरू आहे.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

Advertisement

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून कार्यालयाच्या समोरील बाजूस लावले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. परंतु एखाद्या कामाला आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एप्रिल व मे हा सुटीचा कालावधी असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जात आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. इतर अधिकाऱ्यांना विचारले असता दोन दिवसांत विभाग सुरू होईल, असे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.