बोगस एजंटांनी लग्नाचा मांडला बाजार
लग्न ठरत नसलेल्या तरुणांची होतेय फसवणूक
लाखो रूपयांना होतोय बनावट लग्नाचा सौदा
फसवणुकीमुळे अनेक कुटूंबांची वाताहत
राधानगरी तालुक्यातील राशिवडे, धामोड येथे बोगस लग्न करून दोन तरूणांची प्रत्येकी चार लाखांहून अधिक अर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अशा घटना केवळ कोल्हापुरात घडल्या नसून शेजारील सांगलीसह अन्य जिह्यातील तरुणही खोट्या लग्नाच्या बेडीत अडकत चालले आहे. लग्न ठरवण्याच्या वाटाघाटींना फसवणुकीच्या धंद्याचे स्वरूप आल्यामुळे ‘शुभमंगल सावधान’ म्हणण्यापूर्वी तरूणांनो ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे.
लग्न ठरवणे, एक नवा संसार सुरु करून देणे हे तसे खुप चांगले काम. पण काळाच्या बदलत्या प्रवाहात या मंगल कार्याचा ‘धंदा‘ सुरु केल्याने त्यामध्ये काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी झालेले प्रमाण, विभक्त कुटुंब पध्दती, नातेवाईकांशी कमी झालेला संपर्क, प्रतिष्ठेच्या खोटया कल्पना, अव्यवहार्य अपेक्षा यामुळे लग्न जुळवणाऱ्या एजंटांचे फावले आहे. या एजंटांकडून लग्नासाठी इच्छूक असलेले तरुण आणि त्यांच्या पालकांची अक्षरश: लुबाडणूक केली जात आहे.
विवाहेच्छूक तरुण-तरुणींकडे आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरु होतो. या शोध प्रक्रियेमध्ये कुटूंबियांसह, नातेवाईक आणि पै-पाहुणे मंडळी प्राधान्याने सहभागी होतात. लग्न जुळवण्याचा कार्यक्रम हा अतिशय चांगल्या अर्थाने घेतला जातो. मुलगा किंवा मुलगीचे लग्नाचे वय झाले की त्यांना पालकांकडून योग्य स्थळे पाहण्यासाठी नातेवाईकांना विनंती केली जाते. पण अलिकडे त्यामध्ये बनवेगीरीचा शिरकाव झाला आहे. विशेषत: मुलांचे लग्न ठरवताना थायकुतीला आलेले पालक अशा धंदेवाईक एजंटांचे लक्ष्य ठरत आहेत.
मुलींबाबत परिपूर्ण माहिती घेऊन लग्न ठरविण्याची गरज
वर्षानुवर्षे लग्न ठरत नसलेली मुले आणि त्यांच्या पालक एजंटांवर डोळे झाकून विश्वास ठेवून त्यांच्याकडील मुलींसोबत लग्न लावतात. पण अवघ्या काही दिवसांतच त्यांना फसवणूक झाल्याचे समजते. त्यामुळे अशी मुले आणि त्यांच्या कुटूंबियांनी संबंधित मुलींची आणि त्यांच्या कुटूंबियांची संपूर्ण माहिती घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा लग्नासाठी अगतिक झालेल्या लग्नाळूंची फसवणूक होत राहणार हे निश्चित आहे.
केवळ स्थळ पाहण्यासाठी 5 हजारांचा दर
कोल्हापूर शहर व परिसरातील काही उदाहरणे घेतली तर संबंधित एजंटांकडून नोंदणीसाठीच दोन ते पाच हजार रूपये घेतात. त्यानंतर मुलींची छायाचित्र असणारे अल्बम दाखवतात. पुढची चर्चा करायची असेल तर त्याचे वेगळे शुल्क आकारले जाते. यासाठी एकच ठराविक ‘स्थळ‘ सर्वांनाच दाखवतात. आणि त्या स्थळाने तुम्हाला नापसंत केल्याचे सांगतात. दिसण्यासाठी कुरुप, वय उलटून गेलेल्या, व्यंग असलेल्या, किंवा घटस्फोटीत विवाह ठरविताना संबधित मुलांच्या पालकांची तर अक्षरश? लुट केली जाते. त्यांच्या हतबलतेचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला जातो. वधू किंवा वराची अतिशयोक्ती माहीती सांगायची व वस्तुस्थिती लपवायची हेच तंत्र अनेक ठिकाणी प्रभवीपणे राबवले जात आहे. त्यामुळे या एजंटांबाबत लोकांना खुप वाईट अनुभव आले आहेत. पण गरजू आणि पिचलेले पालक आणि मुलांना सारे निमूटपणे सहन करत असल्याचे चित्र आहे.
एकाच मुलीचे अनेक तरुणांशी लग्न
बोगस लग्न जुळवण्याच्या प्रकियेमध्ये विशेषत: महिला एजंटांची टिम कार्यरत आहेत. त्यांच्याकडे परजिह्यातील, परराज्यातील काही मुली आहेत. या मुलींचे आई-वडिल कोण आहेत, त्यांचे घर कुठे आहे, त्यांच्या मागे कोणता परिवार आहे याची मुलांना कोणतीही माहिती नसते. एजंट महिलांकडून एखादे ठिकाण निश्चित करून मुलगी दाखवली जाते. लग्न ठरवायचे असेल तर दीड ते दोन लाख रूपयांची बोली लावली जाते. यामधील काही रक्कम लग्नापूर्वी तर उर्वरित रक्कम लग्नाच्या ठिकाणी घेतली जाते. लग्नाच्या ठिकाणी ही रक्कम देण्यासाठी टाळटाळ केल्यास संबंधित एजंट भरल्या मांडवातून मुलीला घेऊन गेल्याच्या अनेक घटना आजतागायत घडल्या आहेत. ठरलेली रक्कम दिलीच तर संबंधित मुलगी महिनाभर नव्रयाच्या घरी राहते. त्यानंतर माहेरी जाऊन येतो असे सांगून निघून गेलेल्या अनेक मुली मागे परतलेल्याच नाहीत. अंगावर घातलेले दोन-चार तोळे सोने घेऊन त्या गायब होतात. फसवणूक झालेल्या मुलांनी याचा शोध घेतल्यानंतर त्या मुलींचे यापूर्वी अनेक मुलांसोबत विवाह झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात नेमकी तक्रार कोठे द्यायची अशा कोडींत फसवणूक झालेली मुली सापडली आहेत.
काही दिवसांतच उध्वस्थ होतोय संसार
लग्नासाठी मुली शोधणारा एखादा अडलेला मुलगा अथवा पालक एजंटांच्या जाळ्यात सापडला की तो गुरफटलाच अशी या यंत्रणेची पध्दत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही व्यक्तींनी बिनभांडवली आणि कमाईचे साधन म्हणून हे काम निवडले आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात परजिह्यातील मुली आहेत. त्यामुळे दररोज एका मुलीला लग्नांच्या मांडवात उभा करून लाखो रूपयांची कमाई केली जात आहे.