स्टिंग ऑपरेशनचा बागुलबुवा
स्टिंग ऑपरेशनवरून काँग्रेस विरुद्ध भाजप-निजद युतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनीही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मंत्र्यांना सावध केल्याचे सांगितले आहे. स्टिंग ऑपरेशनची सुरुवात कोणी केली? हे काँग्रेसजनांना माहिती आहे. आम्हाला त्याची गरज नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले आहे. काँग्रेसनेच स्टिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे. आता आपल्यावर आरोप केला जात आहे. आपल्याकडून तसे प्रयत्न सुरू असल्याचे वाटत असेल तर सरकार तुमचेच आहे. खुशाल चौकशी करा, असे आव्हान कुमारस्वामी यांनी दिले आहे.
कर्नाटकातील डी. के. शिवकुमार सरकारने चार महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यासाठी आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी चार महिन्यांचा काळ खूपच कमी वाटतो. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून डी. के. शिवकुमार यांची सावध वाटचाल सुरू आहे. पक्षांतर्गत असंतुष्टांबरोबरच पक्षाबाहेरील विरोधकांच्या कारवायांनाही डी. के. शिवकुमारांना तोंड द्यावे लागत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार यशवंतराय गौडा यांनी चार महिन्यात दुसऱ्यांदा राजीनामा दिला आहे. आपल्याच सरकारमधील अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिजोरीतील खडखडाटाबद्दल दिलेल्या पत्रामुळे शिवकुमार यांच्यावर विरोधकांनी टीका वाढवली आहे. आर्थिक संकटामुळे विकासकामांना निधी मिळत नाही, अशी स्थिती आहे. गॅरंटी योजनांमुळेच अशी वेळ येऊन ठेपली आहे, असे सत्ताधारी आमदार उघडपणे बोलू लागले आहेत.
आपल्या मतदारसंघात विकासकामे राबविण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही, अशी ओरड सिद्धरामय्या मुख्यमंत्री असल्यापासूनच सुरू आहे. निधी मागणाऱ्या आमदारांना भाजपच्या राजवटीत आर्थिक शिस्त नव्हती. त्यामुळेच आमच्यावर मोठा भार पडला आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर नक्कीच निधी देऊ, असे सांगत सिद्धरामय्या यांनी आपल्या आमदारांची समजूत घातली होती. विद्यमान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासमोरही मतदारसंघांच्या विकासासाठीच्या निधीचा मोठा प्रश्न आहे. परिस्थिती अशी असताना मुख्यमंत्र्यांनी आपण जाईल तेथे नवे कार्यक्रम जाहीर करण्याचा सपाटा सुरू ठेवला. त्यामुळेच आर्थिक विभागाने तिजोरीतील खडखडाटाविषयी माहिती देत नव्या योजनांची घोषणा करू नये, अशी विनंती केली. सरकारवर टीका करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या हाती चांगलाच विषय मिळाला आहे.
आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही, महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले नाही म्हणून अनेक आमदार आजही नाराज आहेत. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर वक्कलिगांचा नेता कोण? या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाने नवे वळण घेतले आहे. केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी सध्या कर्नाटकावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या ना त्या कारणाने शिवकुमार सरकारला लक्ष्य बनविण्याबरोबरच दक्षिणेतील आपले बालेकिल्ले आपल्या ताब्यातच ठेवण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असतानाच मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांना दिलेला सल्ला चर्चेचा विषय ठरला आहे. ‘तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सावध रहा’ असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळातील जे पाच मंत्री रडारवर आहेत, त्या मंत्र्यांना तर विशेष सल्ला देत प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगा, तुमचे स्वीय साहाय्यक किंवा इतर कोणीही कोणाशी फोनवर बोलताना तारतम्य ठेवा, तुम्हाला अडकवण्यासाठी दोन टीम कार्यरत आहेत, असे सांगितले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याची वाच्यता केली आहे. मंत्री मागडी बालकृष्णा यांनी तर केंद्रीयमंत्री कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वत: कुमारस्वामी स्टिंग ऑपरेशनचा पितामह आहेत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी त्यांनीच काही तरी डाव रचले असतील, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या टीकेनंतर कुमारस्वामी यांनीही तितक्याच ताकदीने सरकार व मंत्र्यांविरुद्ध पलटवार केला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडूनच स्टिंग ऑपरेशन सुरू असेल. माजी मंत्री के. एन. राजण्णा व माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणी कोणामुळे वाढल्या? असे प्रश्न उपस्थित करीत डी. के. शिवकुमार हेच स्टिंग ऑपरेशनचे धनी आहेत, असे सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांपासून सावध रहा, असा सल्ला दिला आहे. खरेतर ज्यांचे आचारविचार, वागणेबोलणे शुद्ध आहे, त्यांनी कोणत्याच षड्यंत्रांना घाबरण्याचे कारण नाही. आत्मसाक्षीने जनसेवेसाठीच आपण कार्यरत आहोत, असे सांगणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर यापुढे आपण मंत्री होणार की नाही? किमान आपली आमदारकी तरी टिकून राहील की नाही? याची ज्यांना शंका वाटते ते सरळ कामाला लागले आहेत. खरेतर अशा नेत्यांनाच स्टिंग ऑपरेशनची भीती असते. मागडी बालकृष्णा व एच. डी. कुमारस्वामी हे एकेकाळी जीवलग मित्र होते. आता कुमारस्वामी यांची साथ सोडून बालकृष्णा यांनी डी. के. शिवकुमार यांना आपला नेता मानले आहे. शिवकुमार मंत्रिमंडळात कुमारस्वामी यांचे जुने मित्र आहेत. त्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्टिंग ऑपरेशनवरून काँग्रेस विरुद्ध भाजप-निजद युतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. स्वत: उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनीही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मंत्र्यांना सावध केल्याचे सांगितले आहे. स्टिंग ऑपरेशनची सुरुवात कोणी केली? हे काँग्रेसजनांना माहिती आहे. आम्हाला त्याची गरज नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले आहे. काँग्रेसनेच स्टिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे. आता आपल्यावर आरोप केला जात आहे. आपल्याकडून तसे प्रयत्न सुरू असल्याचे वाटत असेल तर सरकार तुमचेच आहे. खुशाल चौकशी करा, असे आव्हान कुमारस्वामी यांनी दिले आहे. जे असे प्रकार करतात, ते आपले कर्म भोगतात, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कर्नाटकाच्या राजकारणात स्टिंग ऑपरेशनची प्रथा काही नवी नाही. याच स्टिंग ऑपरेशनमुळे व्ही. एस. कौजलगी या बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याला प्रदेश काँग्रेस पदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनाही जाळ्यात अडकवण्यात आले. त्यानंतर हनीट्रॅप व स्टींग ऑपरेशन कोण करते? कोणाची सीडी फॅक्टरी आहे? कोणी कोणाचे पेनड्राईव्ह ठेवले आहेत? यासंबंधीच्या चर्चेने उचल खाल्ली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या सावधगिरीच्या सल्ल्यानंतर ताकही फुंकून पिण्याची वेळ काँग्रेस नेत्यांवर येऊन ठेपली आहे.
रमेश हिरेमठ
