Sangli : कृष्णानदीत अल्पवयीन तरुणीचा सापडला मृतदेह
अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा चर्चेत
मिरज : सांगलीतील कृष्णानदीच्या आयुर्विन पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह पंधरा दिवसानंतर निलजी बामणी येथे नदीपात्रात मिळून आला. नेहा बाले सहानी (वय १४ वर्षे, सहा महिने, रा. हनुमान मंदिर, संजयनगर, सांगली) असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणीचे नांव आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे. छट पुजेदिवशी सांगलीतील आयुर्विन पुनावरुन नेहा सहानी या तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केली होती.
याबाबत सांगली ग्रामीण पोलिसात नोंद केली. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मृतदेह मिळून आला नव्हता. मंगळवारी पहाटे निलजी-बामणी येथे कृष्णा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.
याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांना पाचारण करुन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवली असता मयत तरुणी ही नेहा सहानी असून, तिने पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहावर शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली.