कास परिसरात मृतदेह आढळला; खूनाचा संशय
सातारा :
कास पुष्प पठारानजीक असलेल्या अंधारी (ता. जावली) गावच्या हद्दीतील एसटी बस स्टॉप पासून एस वळणावरील खाली बाजुने बामणोलीकडे जाणाऱ्या झाडीत गुरूवारी सकाळी एका 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी मेढा व सातारा तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली असता या व्यक्तीचा खून झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. संजय गणपत शेलार (रा. अंधारी ता. जावली) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंधारी गावच्या हद्दीत गुरूवारी सकाळी संजय शेलार याचा झाडीझुडपात मृतदेह आढळून आला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी मेढा व सातारा तालुका पोलिसांना यांची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला. मेढा पोलिसांनी संजयचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. तो अंधारी गावात राहत असून वाई येथील एका हॉटेलच्या कन्स्ट्रक्शनवर तो कामाला होता. आपल्या पत्नी व दोन मुलासह तो वाई येथे राहत होता. दोन दिवसापूर्वी अंधारी या मुळ गावी तो परत आला होता. परंतु दोन दिवसांनी परत घरी न आल्याने पत्नीने गावाकडील नातेवाईकांना फोन करून चौकशी केली. तेव्हा तो गावाकडे आला नसल्याचे सांगण्यात आले. तोच गुरूवारी सकाळी अंधारी गावच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला. यामुळे संजय शेलार यांचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
त्याच्या सोबत असलेला व्यक्ती कोण ?
मयत संजय शेलार याला दारूचे व्यसन आहे. त्याची स्वत:ची रिक्षा असून त्या रिक्षाने तो ये जा करत होता. तो वाई येथील कन्स्ट्रक्शन कामावरून जाताना एक व्यक्ती सोबत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो व्यक्ती आणि रिक्षा ही त्याच्याजवळ नाही. यामुळे संशयाची सुई त्या व्यक्तीच्या बाजूने फिरत असून लवकर तपासात सर्व बाब समोर येतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.