For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमधून वाहून येणारे मृतदेह भारतापर्यंत

06:07 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमधून वाहून येणारे मृतदेह भारतापर्यंत
Advertisement

नेपाळच्या नद्यांमधून मृतदेहांचा प्रवाह सुरूच : ओळखीसाठी मृतदेह तात्पुरत्या शवागारांमध्ये संग्रहित

Advertisement

► वृत्तसंस्था / काठमांडू, नवी दिल्ली

नेपाळमधील विनाशकारी पुराचे परिणाम आता भारतात जाणवत आहेत. नारायणी नदीच्या पुराच्या पाण्यासोबत मृतदेह वाहत महाराजगंजपर्यंत पोहोचत आहेत. आतापर्यंत तीन मुलांसह चार मृतदेह सापडले आहेत. नदीतून वाहून आलेले मृतदेह, ढिगारे, लाकूड आणि वस्तूंची छायाचित्रे पुरामुळे झालेल्या भीषण विध्वंसाचे दर्शन घडवत आहेत. या आपत्तीमध्ये नेपाळमध्ये आतापर्यंत जवळपास 800 जण मृत झाल्याची नोंदही झाली आहे. या आपत्तीमुळे आतापर्यंत नेपाळ आणि तिबेटमध्ये 785 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 320 भारतीयांसह सुमारे 2,500 लोक बेपत्ता आहेत. सुमारे 400 भारतीय अजूनही तिबेटमध्ये अडकले आहेत.

Advertisement

नेपाळमधील भोटे कोसी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या लोकांचे मृतदेह अनेक ठिकाणी बाहेर काढले जात आहेत. हे मृतदेह नदीतून बाहेर काढून विविध ठिकाणी ओळखीसाठी ठेवण्यात आले आहेत. रसुवा, नुवाकोट, चितवन, तनहुन, नवलपरासी, गोरखा आणि इतर जिह्यांमधून वाहणाऱ्या नद्यांमधून हे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. याचदरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी काही लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत. बचाव पथके त्यांना नदीपासून दूर राहण्याचा वारंवार इशारा देत आहेत, तरीही अनेक जण लाकूड आणि इतर वस्तू परत मिळवण्यासाठी पाण्यात उतरण्याचे धाडस करत आहेत.

नारायणी नदीत पाण्यासोबतच लाकूड, घरातील सामान, सिलिंडरसुद्धा वाहून येत आहे. याचदरम्यान, बचाव पथकाला नदीत मृतदेहही आढळले. सापडलेले चार मृतदेह तीन महिला आणि एका पुरुषाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. हे मृतदेह सध्या तात्पुरत्या शवागारांमध्ये ठेवण्यात आले असून त्यासंबंधीची माहिती नेपाळला कळविण्यात आली आहे. महाराजगंज प्रशासनाने मृतदेह सापडल्याची माहिती नेपाळला पाठवली आहे. ओळख पटवण्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओदेखील पाठवण्यात आले आहेत. प्रशासन आता पुढील कारवाईच्या निर्णयाची वाट पाहत आहे. नदीकिनारी तैनात असलेली बचाव पथके परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. जेव्हा कधी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळते, तेव्हा तपासणीसाठी कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. मानवी मृतदेह आढळल्यास आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तो ताब्यात घेऊन शवागारात पाठवला जातो.

नेपाळमध्ये सापडले 158 मृतदेह

दरम्यान, नेपाळच्या नवलपरासी पूर्व जिह्यात शनिवार संध्याकाळपर्यंत नारायणी नदीच्या विविध भागांतून 158 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. यापैकी 109 मृतदेह पूर्ण होते, तर 49 जणांच्या शरीराचे अवयव सापडले. बाहेर काढलेल्या मृतदेहांमध्ये 31 महिला, 51 पुरुष, 8 मुले आणि 11 मुलींचा समावेश आहे. उर्वरित अवयवांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हिमनदी कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल

26 ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये हिमनदी फुटल्याने आणि भूस्खलनामुळे अचानक पूर आला. आता, या घटनेच्या तीन दिवसांनंतर, हिमनदी फुटल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. टूर गाईड्सच्या एका गटाने तिबेटमधील एका उंच ठिकाणाहून हे क्षण कॅमेऱ्यात चित्रित केले. या व्हिडिओमध्ये नेपाळ सीमेजवळील बर्फाच्छादित पर्वत आणि हिमनद्या दिसत आहेत. अचानक, हिमनदीचा सुमारे 800 मीटर लांबीचा बर्फ आणि खडकांचा एक भाग तुटून खाली दरीत कोसळतो. या हिमस्खलनानंतर, धूळ आणि ढिगारा संपूर्ण परिसरात पसरतो. व्हिडिओमध्ये प्रवाहाच्या दिशेने वाहणारे पाणी आणि ढिगारा देखील दिसत आहे.

पुरामुळे नेपाळच्या जलविद्युत उद्योगाला धोका

नेपाळमधील भीषण पुरामुळे देशाच्या जलविद्युत उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली खोऱ्यांमधील पुरामुळे 14 जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या सहा प्रकल्पांचा समावेश आहे. नेपाळ विद्युत प्राधिकरणाच्या मते, पुरामुळे 431 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता बंद करण्यात आली. हे प्रमाण देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये जलविद्युत प्रकल्प कोठे बांधले जावेत आणि अशा नैसर्गिक धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची रचना कशी केली जावी, यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तज्ञ लहान प्रकल्पांची लवचिकता आणि मोठ्या जलाशयांच्या गरजेवरही चर्चा करत आहेत.

Advertisement
Tags :

.