तरंदळे तलावात युवक-युवतीचा मृतदेह
प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय
कणकवली: कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील तलावात आज, बुधवारी १० डिसेंबर रोजी सकाळी युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांनी एकमेकांना पकडून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला तरी, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मध्यरात्री 1.30 वा. च्या सुमारास तरंदळे येथील तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती मिळताच, कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढले.त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.या घटनेत मृत झालेल्या युवतीची ओळख पटली असून, ती इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांची नावे आणि तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच, मृत युवक आणि युवतीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.प्राथमिक माहिती आणि परिस्थितीनुसार, युवक आणि युवती या दोघांनीही एकमेकांना मिठी मारून किंवा पकडून तलावात उडी घेतली असावी, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. हे प्रेमप्रकरणातून झालेले कृत्य असावे, अशी चर्चा आहे. मात्र, या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण आणि अन्य काही पैलू आहेत का, याचा तपास अद्याप सुरू आहे.कणकवली पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून, पुढील तपासात आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.