बेपत्ता दोघांचे मृतदेह अखेर सापडले
शिरोडा-वेळागर दुर्घटना : पोलिसांचे दोन दिवस अथक प्रयत्न, मत्स्य खात्याच्या ड्रोनमुळे समुद्रातील शोधमोहिमेला यश
वार्ताहर/वेंगुर्ले
शिरोडा-वेळागर येथील समुद्रात बुडालेल्या सातजणांपैकी इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (36, रा. बेळगाव) आणि जाकिर निसार मणियार (13, रा. कुडाळ) या दोघांचे मृतदेह पोलिसांच्या शोधपथकाने दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर समुद्रातून बाहेर काढले. या शोधासाठी मत्स्य विभागाचे ड्रोन महत्त्वपूर्ण ठरले. दोन्ही मृतदेहांची नातेवाईकांकडून ओळख पटली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद वेंगुर्ले पोलिसांत झाली आहे, अशी माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
शुक्रवारी, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास शिरोडा-वेळागर येथील समुद्राच्या पाण्यात उतरलेले कुडाळ गुढीपूर-पिंगुळी येथील मणियार कुटुंबीय व लोंढा-बेळगाव येथील कित्तूर कुटुंबातील सातजण पाण्यात बुडाले होते. त्यापैकी अद्याप न सापडलेले दोघांचे मृतदेह रविवारी मत्स्य खात्याच्या ड्रोनमुळे सापडले. यांत्रिक होडीच्या साहाय्याने हे मृतदेह समुद्रकिनारी आणले. या दोन्ही मृतदेहांची ओळख त्यांच्या नातेवाईकांकडूनही पटली आहे.
बेळगाव येथील इरफान कित्तूर (36) यांचा मृतदेह केळुस, निवती येथील सुमारे आठ वाव खोल पाण्यात मत्स्य खात्याच्या ड्रोन शोधमोहिमेत आढळला. यात्रिक होडीतून तो खोल समुद्रातून किनारी आणला. निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कांदळगावकर, सोन्सूरकर, कदम, गोसावी, कुंभार यांनी ही शोधमोहीम राबविली.
कुडाळ-गुढीपूर येथील जाकिर मणियार (13) याचा मृतदेह उभादांडा-नवाबाग येथून समुद्रात सुमारे सहा किलोमीटर (6 वाव खोल पाणी) अंतरावर मत्स्य खात्याच्या ड्रोन कॅमेऱ्यात दिसून आला. यांत्रिक होडीच्या साहाय्याने शोध घेऊन तो किनारी आणला. वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, योगेश राठोड आणि अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रसाद कदम, योगेश सराफदार, योगेश राऊळ, स्वप्नील तांबे, जोसेफ डिसोजा, जयेश सरमळकर, गजानन देसाई, योगेश मांजरेकर, मनोज पऊळेकर यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
ही शोधमोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. यासाठी मत्स्य विभागाचे ड्रोन वापरण्यात आले. तसेच प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओतारी यांनी दिली. दरम्यान. समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची शोधमोहीम पोलीस यंत्रणेने स्थानिक पोलीस पाटील, सागर सुरक्षा रक्षक व मच्छिमार यांच्या सहकार्यातूनही राबविली होती.