कठुआमध्ये तीन नागरिकांचे मृतदेह हाती
दहशतवाद्यांनी हत्या केल्याचा संशय
वृत्तसंस्था / कथुआ
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथून बेपत्ता झालेल्या तीन नागरिकांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या प्रदेशाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे मृतदेह कठुआ नजीकच्या एका धबधब्याशेजारी शनिवारी आढळून आले. बेपत्ता झालेल्या नागरिकांची नावे दर्शन सिंग, योगेश सिंग आणि वरुण सिंग अशी असून हे तिघेही 5 मार्चपासून बेपत्ता होते. ते एका लग्नसमारंभाहून परतत असताना बेपत्ता झाले होते. त्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधअभियान हाती घेण्यात आले होते. सद्यस्थितीत दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने या प्रश्नावर प्रदेशाच्या सरकारला विधानसभेत धारेवर धरले होते. या तिघांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. हा अपघात आहे की घातपात यासंबंधी अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीनंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारीतही याच भागात दोन प्रौढ व्यक्तींचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले होते.