For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिलगलेल्या मातापुत्राचे मृतदेह हाती

06:21 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिलगलेल्या मातापुत्राचे मृतदेह हाती
Advertisement

मध्यप्रदेशात नौका दुर्घटनेतील हृदयद्रावक घटना

Advertisement

वृत्तसंस्था / जबलपूर

मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर या जिल्ह्यात प्रवासी नौका बुडाल्याने झालेल्या दुर्घटनेत एक माता आणि तिच्या चार वर्षांच्या पुत्राचा मृत्यू झाला आहे. नौका बुडताना शेवटच्या क्षणी मातेने आपल्या पुत्राला घट्ट धरुन ठेवले. या दोघांचेही त्याच स्थितीतील मृतदेह साहाय्यता कर्मचाऱ्यांच्या हाती लागले आहेत. हे हृदयद्रावक दृष्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय रहात नाही, असा अनुभव येत आहे. या दुर्दैवी मातेने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या 4 वर्षांच्या पुत्राला आणि त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या असलेल्या कन्येला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, ही माता आणि पुत्र यांचा मृत्यू झाला. मात्र, तिचा पती, कन्या सिया आणि या महिलेचे पिता या दुर्घटनेतून वाचले आहेत. या माता आणि पुत्राला मृत्यूदेखील अलग करु शकला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Advertisement

या मातेची कन्या सिया, पती आणि पतीचा पिता हे या दुर्घटनेतून वाचले आहेत. सुखरुप नदीतटावर आल्यानंतर सिया कितीतरी वेळ तिचा भाऊ आणि माता यांचा बळी घेणाऱ्या नदीपात्राकडे पाहून रडत होती, अशी माहिती समोर येत आहे. उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी नौकानयन करताना या प्रवासांवर काळाचा क्रूर घाला पडला. त्यात मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांच्या करुण कहाण्या आता ज्ञात होऊ लागल्या असून त्या समजल्यावर साऱ्यांनाच अतिव दु:ख होत आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 10 वर पोहचल्याची माहिती दिली गेली.

मुसळधार पावसामुळे दुर्घटना

30 एप्रिलला मध्यप्रदेशातील नर्मदा नदीत नौकाविहार करण्यासाठी अनेक परिवार आलेले होते. उन्हाळ्याची सुटी आनंदात साजरी करण्याची त्यांची योजना होती. मात्र, नौका नदीच्या मध्यभागी आल्यानंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला. तसेच मोठ्या लाटांमुळे नौका हेलकावे खाऊ लागली. अखेरीस ती एका बाजूला कलल्यामुळे बुडू लागली. प्रवाशांना लाईफ जॅकेट्स् देण्यात विलंब लागला, असा आरोप केला जात आहे. मात्र, अनेक प्रवाशांचा जीव लाईफ जॅकेट्स्मुळे वाचल्याच्याही घटना घडल्या आहेत. तथापि, 10 जणांना प्राण गमवावे लागले.

दिल्लीच्या मैसी परिवारावर घाला

या दुर्घटनेत दिल्लीच्या मैसी परिवाराची मोठी हानी झाली आहे. या परिवारातील लोक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी येथे आले होते. नदीत जलविहार करत असताना त्यांना या दुर्दैवाने घेरले. नौकेचे व्यवस्थापन करणाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप होत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे केलेले दुर्लक्ष, नौकेत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसणे, यामुळे जीवीत हानी झाली, असे स्पष्ट होत आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश मध्यप्रदेश सरकारकडून देण्यात आलेला आहे.

Advertisement
Tags :

.