कुस्मण-केपे येथील घरात आढळले माय-लेकीचे मृतदेह
मुलीचा मृतदेह सापडला गळफास घेतलेल्या स्थितीत
त. भा. वार्ताहर
केपे : कुस्मण-केपे येथील घरात अलका शिरवईकर (77) व अनर शिरवईकर (42) या माय-लेकीचे मृतदेह आढळण्याची घटना घडली असून त्यांना मृत्यू येऊन तीन-चार दिवस उलटल्याचा अंदाज आहे. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. केपे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविले आहेत.
केपे पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, केपे ते मडगाव मुख्य रस्त्यावर हे घर असून या घरात त्या दोघी राहत होत्या. शनिवारी सकाळी घरातून काही तरी कुजल्याची दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसाना दिली. त्यानंतर केपे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अलका शिरवईकर यांचा मृतदेह पलंगावर झोपलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर घरातच त्यांची कन्या अनर शिरवईकर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. पुढील तपास केपे पोलिस करत आहेत.