हिमस्खलनात अडकलेल्या चौघांचे मृतदेह सापडले
उत्तराखंड दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू : 54 पैकी 46 जणांना वाचविण्यात यश : शोधकार्यात श्वान पथकाचीही मदत
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील चमोली येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या पथकांना तिसऱ्या दिवशी चौघांचे मृतदेह सापडले. या मोहिमेत 54 जण अडकले होते. त्यापैकी सर्वांचा शोध लागला असून या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तराखंडमधील चमोली जिह्यातील माना आणि बद्रीनाथ दरम्यान असलेल्या बीआरओ कॅम्पमध्ये शुक्रवारी हिमस्खलन झाल्यानंतर सैन्याकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 जणांना बाहेर काढण्यात आले, तर पहिल्या दिवशी शुक्रवारी 33 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी उर्वरित चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ड्रोन, रडार सिस्टीम, स्निफर डॉग, बळींचे स्थान आणि थर्मल इमेज कॅमेऱ्यांचा वापर करून शोधकार्य राबविण्यात आले. या मोहिमेत 7 हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आली होती.
उत्तराखंडमधील चमोली जिह्यात झालेल्या हिमस्खलनाच्या तीन दिवसांनंतर, रविवारी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला. चमोली-बद्रीनाथ महामार्ग खुला करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) अधिकारी दिवसरात्र काम करत होते. कांचन गंगा, राडांग बंद आणि इतर ठिकाणी महामार्गावर 11 फूट बर्फ पडला होता. आता बीआरओने मशीनने बर्फ कापून मार्ग मोकळा केला आहे. त्याचवेळी, हिमस्खलनात अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेण्यात सैन्य व्यग्र होते. लष्कर आणि हवाई दलाव्यतिरिक्त आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे 200 हून अधिक सैनिकांनी घटनेच्या ठिकाणी बेपत्ता कामगारांचा शोध घेतला. सुरुवातीला बेपत्ता कामगारांची संख्या 55 असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु शनिवारी एक कामगार कोणालाही न कळवता छावणीतून आपल्या गावी निघून गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही संख्या 54 असल्याचे स्पष्ट झाले होते.
28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:15 वाजता चमोलीच्या माना गावात हा अपघात झाला. मोली-बद्रीनाथ महामार्गावरील एका कंटेनर हाऊसमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) कामगार वास्तव्यास असताना बर्फाचा डोंगर कोसळल्यामुळे सर्व कामगार हिमस्खलनाच्या कवेत सापडले होते. अडकलेल्या कामगारांच्या शोधासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. अडकलेल्या कामगारांमध्ये बहुतेक बिहार आणि उत्तर प्रदेशातील आहेत. अपघातात अडकलेल्या 54 कामगारांपैकी 11 बिहारचे, 11 उत्तर प्रदेशचे, 11 उत्तराखंडचे, 6 हिमाचल प्रदेशचे, 1 जम्मू आणि काश्मीरचा आणि 1 पंजाबचा आहे.
चौघांची प्रकृती गंभीर
वाचविण्यात आलेल्या कामगारांवर जोशीमठ येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. त्यापैकी 4 कामगारांची प्रकृती गंभीर आहे. एका कामगाराची प्रकृती अतिगंभीर झाल्यानंतर त्याला ऋषिकेश एम्समध्ये रेफर करण्यात आले. जोशीमठ आर्मी हॉस्पिटलमधील सर्व कामगारांवर पॅनलिस्ट डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. याचे नेतृत्व शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अंकित मिश्रा करत आहेत.
बचावाचे काम आव्हानापेक्षा कमी नव्हते : बीआरओ कमांडर
हिमस्खलनात सापडलेल्या कामगारांना वाचविण्यासाठी लष्कराची मोठी मदत लाभली. तसेच अन्य समकक्ष यंत्रणांनीही मदत व बचाव मोहिमेत सहभाग घेतला होता. बीआरओ कमांडर कर्नल अंकुर महाजन म्हणाले की, आमची मशीन्स दिवस-रात्र हिमखंड कापून बद्रीनाथ धाम आणि मानापर्यंत पोहोचली होती. कठीण भौगोलिक परिस्थितीत हे काम आव्हानापेक्षा कमी नव्हते, परंतु आपल्या सैनिकांनी कठोर परिश्रमाने ते पूर्ण केले आहे. आमच्या मशीननी बर्फ कापून बद्रीनाथ आणि मानाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यांनी बीआरओच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि सैनिकांचे मनोबल वाढवले आहे.