हमासच्या बोगद्यात सापडले पाच ओलिसांचे मृतदेह
मघाजी पॅम्पवर इस्रायलचा हवाई हल्ला : 70 ठार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायली लष्कराला गाझा शहरातील एका बोगद्यात ओलीस ठेवण्यात आलेल्या 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. हमाससोबतचे बोगद्याचे नेटवर्क नष्ट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. रविवारी संध्याकाळी एका बोगद्यात 5 जणांचे मृतदेह आढळले. या लोकांना 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते, असे इस्रायली लष्कराने सांगितले. याचदरम्यान रविवारी रात्री उशिरा इस्रायली लष्कराने मघाजी निर्वासित पॅम्पवर हल्ला केला. यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपला देश हमासविऊद्ध सुरू असलेल्या युद्धात अन्य कोणत्याही देशाच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी यासंबंधी बोललो असून इस्रायल आपले लक्ष्य साध्य केल्याशिवाय युद्ध थांबवणार नसल्याचा इशाराही त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
हमासने छेडलेल्या आक्रमक पवित्र्यात आमचे 1200 नागरिक मारले गेले. लहान मुले आणि महिलांना क्रूरतेचे लक्ष्य बनवण्यात आले. आता आम्ही आमचे सर्व लक्ष्य साध्य करेपर्यंत गाझामधील युद्ध थांबणार नाही. सर्व ओलिसांची सुटका करणे आणि हमासचा पूर्णपणे खात्मा करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असल्याचे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, इस्रायलने आता गाझा आणि लेबनॉनमध्ये एकाचवेळी हल्ले सुरू केले आहेत. याचे कारण लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाला इराणकडून शस्त्रे मिळत असून हमासच्या मदतीसाठी ते इस्रायलवर मोठे हल्ले करत आहेत.