मासळीची आवक घटल्याने नौका किनाऱ्यावर !
दापोली :
हर्णे बंदरातून मासेमारीला जाणाऱ्या मच्छीमारांना दोन ते तीन दिवस समुद्रात फिरून मासळी पुरेशी मिळत नसून डिझेलचा खर्चदेखील सुटत नसल्याचे समोर येत आहे. हा एलईडीचा, पर्ससीननेटचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील हर्णे बंदरात ८०० ते ९०० नौका मासेमारीसाठी जातात. मात्र सध्या समुद्रात मासेच मिळत नाहीत. दोन ते तीन दिवसांनी येणारा मच्छीमार किरकोळ प्रमाणात मासे आणत आहे. यामुळे बोटीवर कामाला असणाऱ्या माणसांचा, डिझेल असा खर्चही सुटत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. समुद्रात वाढणारी एलईडी मासेमारी यामुळे सारी छोटी-मोठी मासळी चोरून नेली जात आहे. यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पदरात निराशा पडत आहे. हर्णे बंदरात सध्या बारीक कोलीम, बारीक कोळंबी, किरकोळ प्रमाणात बारी मांदेली तर कुठे म्हाकूळ मिळत आहे. त्यामुळे ही बारीक मासळी १००, ३००, ४०० रुपये प्रती किलो विकली जात आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे अनेक बोटी किनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी काही मोठ्या माशांचे दर किलोमागे १,२०० वर पोहोचले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासेमारीत अल्प मासे मिळत असल्याने डिझेलचा खर्च सुटत नसल्याकारणाने अनेक बोटी आंजर्ले खाडीत नांगरून ठेवण्यात आल्याचे मच्छीमार गोवर्धन पावसे यांनी सांगितले.
या बाबत हर्णे पाज फिशिंग सोसायटीचे सचिव किशोर वाघे म्हणाले, एलईडी, परप्रांतीय मासेमारी करणाऱ्या नौकां तळागाळातील मासळी पळवत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना खूप अल्प मासळी मिळत आहे. यातून डिझेलचाही खर्च सुटत नाही. त्यामुळे बोटी किनाऱ्यावर ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे