अवैध एलईडी मासेमारी साहित्य असलेली नौका ताब्यात
पहाटे निवती समुद्रात कारवाई
मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने निवती समोरील समुद्रात अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात घेतली आहे. नौकेवर नौका तांडेलसह 20 खलाशी असून सदर नौका जप्त करून पुढील कारवाईसाठी सर्जेकोट बंदरात आणली आहे.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय एलईडी पर्ससीन नौकेवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने दिली आहे.सिंधुदुर्ग, मालवण मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार 4 एप्रिल रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास निवती समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) व सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर हे नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्यातील श्रीमती पल्लवी साईहर्षद धोंड, रा. पणजी गोवा यांची नौका जय IV बॉस , नों.क्र.IND-GA-२-MM-3588 ही नौका महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रातून आवागमन करताना निदर्शनास आली, त्यावेळी नौकेच्या कागदपत्राची तपासणी करिता नौका पाठलाग करून थांबविली असता नौकेवर विधीग्राह्य कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे सदर नौकेची तपासणी केली असता नौकेवर अवैध/अनधिकृतरित्या LED मासेमारीचे साहित्य आढळले. या नौकेवर नौका तांडेलसह इतर 20 खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) व सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग विभागाकडून देण्यात आली आहे.