चोडण धक्क्यावरील बोट आज पाण्याबाहेर काढणार
प्रतिनिधी/ पणजी
चोडण-रायबंदर मार्गावर सेवा देणारी ’बेती’ ही फेरीबोट सोमवारी 23 जून रोजी पहाटे चोडण फेरीधक्क्यावर बुडाल्यानंतर या फेरीबोटीविषयी राजकारणही तापले होते. परंतु ही बोट आता सात दिवसानंतर रविवारी पाण्यातून बाहेर काढण्यात येईल, असे नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले.
चोडण धक्क्यावर बुडालेल्या बोटीच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी साचून राहिल्याने तिचे वजन वाढले आणि ती बुडाली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बोट पुन्हा फ्लोट करण्यासाठी क्रेनसह आवश्यक यंत्रणा घटनास्थळी तैनात करण्यात आली असून, तज्ञांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. फेरीच्या तळभागात साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा झाल्यानंतरच ती पाण्यावर पुन्हा फ्लोट करणे शक्य होणार आहे. यानंतर इंजिन व अन्य भागांतील पाणी पंपांच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येईल. हे काम सुरळीत पार पडल्यास फेरीबोट आजच वर्कशॉपमध्ये नेऊन तिच्या दुऊस्तीचे काम हाती घेतले जाईल.
नदी परिवहन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेल्या फेरीबोटची अनेक वर्षे देखभाल वा डागडुजी झालेली नव्हती. पत्र्यावर गंज चढल्यामुळे बोटीत भेगा पडल्या होत्या आणि त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरत होते. हे पाणी कर्मचाऱ्यांनाच बोटीबाहेर काढावे लागत होते. 24 जून रोजी बोट दुऊस्तीसाठी यार्डात नेण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र, त्याआधीच ती चोडण जेटीजवळ नांगरून ठेवलेली असताना कलंडली आणि बुडाली.
मंगळवारी बोटीवरील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, हे जबाब संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. बोट बुडण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.