कांतारा-1 शूटिंगदरम्यान जलाशयात उलटली बोट
अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीसह अनेक कलाकार सुरक्षित
प्रतिनिधी/ बेंगळूर
‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, शनिवारी रात्री शिमोगा जिल्ह्याच्या मास्ती कट्टे प्रदेशातील माणी जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि इतरांना घेऊन जाणारी एक छोटी बोट उलटली. या घटनेत कोणताही धोका किंवा नुकसान झाले नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.
चित्रपटातील सर्व कलाकार एका बोटीवर चित्रीकरण करत होते. बॅकवॉटर किनाऱ्याजवळ सुमारे तीन फूट खोल पाण्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. बोट उलटल्यानंतर ऋषभ शेट्टीसह सर्वजण पाण्यात पडले असून पोहत किनाऱ्यावर पोहोचले आहे. बोटीत 10 हून अधिक लोक होते, असे सांगण्यात आले. जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये एका मोठ्या सेटवर कांतारा चॅप्टर-1 चे चित्रीकरण केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची टीम मास्तिकट्टेजवळील एका होमस्टेमध्ये राहून शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
कोणतीही दुर्घटना घडली नाही : कार्यकारी निर्माता आदर्श
होंबळे फिल्म्सचे कार्यकारी निर्माता आदर्श यांनी या घटनेचा आरोप फेटाळून लावला आहे. कांतारा-1 च्या शूटिंगदरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नाही, असे स्पष्ट केले आहे. आम्ही कांतारा भाग-1 चे शूटिंग माणी जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये करत होतो. आमच्या शूटिंगच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर आम्ही एक बोट पार्श्वभूमी म्हणून ठेवली होती. शनिवारी जोरदार वारा आणि पावसामुळे बोट उलटली. त्याठिकाणी कोणीही कलाकार नव्हते. आम्ही ज्या ठिकाणी शूटिंग करत होतो ते ठिकाण तिथून बरेच दूर आहे. बोट उलटल्याने कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. आम्ही रविवारी आमचे शूटिंग सुरू केले, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, आमच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व परवानगी पोलीस विभाग, वनविभाग, केपीसी आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडून घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, आम्ही पाण्यात चित्रीकरण करत नाही. परंतु आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही स्पीडबोट्स आणि डायव्हिंग तज्ञांसह खबरदारीचे उपाय केले आहेत, असेही कार्यकारी निर्माता आदर्श यांनी स्पष्ट केले.