बोर्ड परीक्षा : याचिकेवरील निकाल राखून
प्रतिनिधी/ बेंगळूर
शालेय शिक्षण खात्याने निश्चित केलेल्या पाचवी, आठवी आणि नववी इयत्तांसाठी बोर्डाच्या परीक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. या परीक्षेवरील स्थगिती उठविण्यासंबंधी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयात वर्ग केल्या आहेत. उच्च न्यायालयाने सदर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे निकालाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
राज्यात शालेय शिक्षण खात्याने पाचवी, आठवी, नववी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी केली होती. याविरोधात खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली. एकसदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारचा आदेश रद्द केला. या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाकडे आव्हान दिले. सुनावणीनंतर द्विसदस्यीय खंडपीठाने परीक्षेला ग्रीन सिग्नल दिला. त्यानुसार 11 मार्चपासून बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला. दरम्यान, खासगी शाळा व्यवस्थापन संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने बाकी असणाऱ्या बोर्डाच्या पेपरना स्थगिती दिली. त्यामुळे शालेय शिक्षण खात्याने उर्वरित पेपर लांबणीवर टाकण्याच्या सूचना दिल्या. पुन्हा एकदा शिक्षण खात्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे. एक-दोन दिवसांत न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.