बीएमडब्ल्यू वाढवणार कार्सच्या किमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लक्झरी कार्सच्या क्षेत्रात अग्रेसर असणारी कंपनी बीएमडब्ल्यू यांनी आपल्या कार्सच्या किमती पुढील वर्षीपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमडब्ल्यू आपल्या भारतातल्या कार्सच्या किंमती 1 जानेवारी 2025 पासून 3 टक्केपर्यंत वाढवणार आहे. सर्व प्रकारच्या मॉडेलच्या किमती वाढवल्या जाणार असून यात भारतात तयार केलेल्या आणि तयार आलेल्या कार्सचा समावेश असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यात बीएमडब्ल्यू 2 सिरीजची ग्रेन कुपे, 3 सिरीजची लाँग व्हीलबेस, 5 सिरीजची लाँग व्हीलबेस, 7 सिरीजची लाँग व्हीलबेस, एक्स 1, एक्स 3, एक्स 5, एक्स 7 आणि एम340 आय या मॉडेलच्या किमती वाढलेल्या दिसतील. इलेक्ट्रीक कार्स बीएमडब्ल्यू आय 4, आय 5, आय 7, आयएक्स 1 व आयएक्स, बीएमडब्ल्यू झेड 4 एम 40 आय, एम 2 कुपे, एम 4 कॉम्पीटीशन आणि हायब्रिड बीएमडब्ल्यू एक्स एम या कार्सच्या किंमतीही वाढवल्या जाणार असल्याचे समजते. ग्राहकांकरीता बीएमडब्ल्यू इंडिया फायनॅन्शीयल सर्व्हिसेसने आकर्षक मासिक हप्त्याची योजना, कमीत कमी व्याजदराची आकारणी व इतर सवलतीच्या योजना कंपनीने आणल्या आहेत. निर्मिती खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीने आपल्या लक्झरी कार्सच्या किमती वाढवण्यात येणार असल्याचे कारण पुढे केले आहे.