मराठी शुध्दलेखनाचा ‘फज्जा’
कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
आज मुलांना मराठीपेक्षा इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याचा कल वाढत चालला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात इंग्लिश सरास सुरू आहे. आजच्या युगात लहान वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन आल्याने, मराठीची ओळख देणाऱ्या अंकलिपीचा वापर कमी होऊ लागला आहे. यामुळे मराठी शुध्दलेखनाबरोबर व्याकरणाचा ‘फज्जा’ उडाला आहे.
बालवाडीत प्रवेश घेतानाच मुलांच्या दप्तरमध्ये पाटी,पेन्सिल व मराठी अंकलिपी ठेवले जात असे. यामुळे मराठी भाषेतील 52 वर्णाच्या मुळाक्षरांची ओळख बालवाडीमध्येच होत असे. पण आज पोष्ट ग्रॅज्युएट होऊन देखील, अनेकांना साधे मराठीतील चार ओळीचे पत्र ही शुध्द भाषेत लिहता येत नाही हे मराठी भाषेचे दुर्दैव आहे. मोबाईल,लॅपटॉप,टॅबमुळे अंकलिपीची ओळख आता विसरली जात आहे. व्हाईस,कन्व्हर्ट यामुळे मुलांच्या लिखाण,व्याकरणामध्ये कमतरता जाणवत आहे.
अंकलिपी,बाराखडी म्हणजे मराठी भाषेतील मुळाक्षरे व अंकाची ओळख लहान मुलांना करून देणारी हे छोटे पुस्तकच आहे.. बालवाडीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या दप्तरामध्ये पाटी व रंगीबेरंगी अंकलिपी अनिवार्य असे. यातून अ आ इ ई......या बाराखडीमधून मराठी भाषेचा पाया रचला जात होता. या बाराखडीमध्ये 14 स्वर,36 व्यंजने व 2 ध्वनीचा समावेश आहे. मराठी भाषेत 52 वर्ण असल्याने, या वर्णाच्या मालिकेला मुळाक्षरे म्हणून ओळखले जाते. काना,मात्रा,उकार,वेलांटी यातूनच बाराखडी तयार होऊन,सोपी-सोपी वाक्ये बनवली जात असे. यातूनच व्याकरण, शुध्दलेखन व पाढे याची ओळख होत असे. पण आज हे चित्र बदलून गेले आहे. अंकलिपीचा वापर कमी होऊ लागला आहे. मराठी भाषा जतन करावयाची असेल तर, प्रत्येकाच्या घरात एक तरी अंकलिपी असणे गरजेचे आहे.
मराठी माध्यमामध्ये आता बारा ऐवजी जादा दोनमुळे चौदाखडी अशी ओळख करण्यात आली आहे. आज ही मराटी प्राथमिक शाळामध्ये अंकलिपीचा वापर होत आहे. पण यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या वाचन व लिखाणावर जोर दिला जात आहे. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील लिखाण व व्याकरण यावर मात्र मोठा परिणाम होत आहे.
-विनोदकुमार भोंग, मुख्याध्यापक, विचारे विद्यालय