शिट्टी अशी वाजवा की विरोधकांची हवा गुल झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे शिरोळकरांना आवाहन
शिरोळ :
लाडक्या बहिणींच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली. काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत, पण हा एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही. शिरोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील १ लाखाहून अधिक बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. अशा भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिरोळ येथील टारे मल्टीपर्पज हॉल येथे महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महिलांनी शिट्टी वाजवून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवली आहेत. या योजनेला महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, विरोधक ही योजना बंद करून सर्वांची चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र, लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जाईल, पण ही योजना बंद होऊ देणार नाही.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर असा कार्यकर्ता आहे, तो कसा पण उभा राहिला तर निवडून येतो, २० तारखेला लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी मतदान करावे, जेणेकरून समोरच्याची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.