बहरलेला चाफा आणि सजलेली शिवजयंती
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
चाफ्याचे झाड पानांनी कमी आणि फुलांनी अधिक बहरलेले असते. झाड मूळ धरेपर्यंत थोडी काळजी घेण्यासारखे. पण एकदा त्याने मूळ धरले की ते भन्नाट वाढते. पानापेक्षा फुलांनीच अधिक लगडून जाते. या चाफ्याचे शास्त्राrय गुणधर्मही खूप उपयोगी. पण कोल्हापूरकरांसाठी हा चाफा यावर्षी एक ऐतिहासिक प्रेरणा सोबत घेऊन फुलणार आहे. कारण पन्हाळगड ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सव्वालाख चाफ्याच्या फुलांचा अभिषेक पन्हाळगडावरील सोमेश्वर महादेव मंदिरात घातल्याची इतिहासात नोंद आहे आणि तशाच अभिषेकाचा संकल्प करून कोल्हापूर परिसरात 50 हजार झाडाचे जतन करण्यात येणार आहे.
या संकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात यावर्षीच्या गुढीपाडव्यापासून होणार आहे. चाफ्याच्या झाडांचे जतन, त्याला फुले येणे यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागणार असल्याने अतिशय नियोजनबद्ध पन्नास हजार चाफ्याच्या झाडांचे संवर्धन करण्यात येणार आहे. सावली सोशल फौंडेशनच्यावतीने हे नियोजन करण्यात आले आहे. सरसकट सर्वांना असे चाफ्याच्या झाडाचे वाटप न करता विविध संस्था जबाबदार व्यक्ती, वेगवेगळे उद्योग समूह, शाळा, महाविद्यालये, कॉलनी, ग्रामपंचायत, नगर पालिका, महापालिका यांनी ते जतन करायचे आहे. या निमित्ताने शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण तर आहेच. पण 50 हजारांपैकी किमान 30 हजार चाफ्याची झाडे जगतील, असा अंदाज धरून सारे नियोजन केले गेले आहे. एक मोठे निसर्गपूरक काम या निमित्ताने होणार आहे.
या संकल्पासंदर्भात सावली केअर सेंटरचे डॉ. किशोर देशपांडे यांनी सांगितले, की इतिहासाचे जतन आणि ते ही वन, वेली, पर्यावरणाच्या साथीने व्हावे, हा या संकल्पनेचा उद्देश आहे. 2030 हे साल शिवरायांच्या जन्माचे 400 वे वर्ष आहे. हे वर्ष व त्यापुढची वर्षे शिवजयंती आगळ्dयावेगळ्dया पद्धतीने साजरी व्हावी, अशा तयारीने आज शिवजयंतीच्या दिवशी या संकल्पाची घोषणा करण्यात आली. मात्र हा संकल्प पूर्ण व्हायचा असेल तर आजपासून पुढची 5 वर्ष 50 हजार चाफ्यांचे जतन करावेच लागणार आहे.
ते म्हणाले, यासाठी चाफ्याची बऱ्यापैकी मूळ धरलेली रोपे, जिह्यातील जबाबदार व्यक्ती, संस्था, काही ग्रामपंचायती, नगरपालिका, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, महापालिकांना देण्यात येणार आहेत. त्यांनी आपापल्या परिसरात त्याचे जतन करायचे आहे. या 50 हजारांपैकी 30 हजार झाडे नक्कीच जगतील, असा नर्सरी क्षेत्रातील जाणकारांचा अनुभव आहे. प्रत्यक्ष पुष्प अभिषेकाच्या क्षणी सव्वालाख फुले उपलब्ध असणार आहेत आणि त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी शिवजयंतीला हा चाफ्याचा अभिषेक घालता येणार आहे. इतिहासाचे स्मरण ठेवत हा निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रम आहे.
- सोमेश्वर तलाव.. सोमेश्वर मंदिर
पन्हाळगडावर तहसीलदार कार्यालयाच्यासमोरच मोठा सोमेश्वर तलाव आहे. नैसर्गिक पाण्याचा त्यात साठा आहे. कडेने दगडी बांधकाम आहे. तलावाच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या सोमेश्वराला शिवाजी महाराजांनी सव्वालाख चाफ्याच्या फुलांनी अभिषेक घातला होता, असा इतिहास आहे. त्यातील काही फुले सोन्याने मढवली होती, अशीही माहिती आहे. त्या तलावाच्या काठावर आजही असंख्य चाफ्याची झाडे उभी आहेत. आता सव्वालाख फुलाचा अभिषेक आणि चाफा संवर्धनाच्या निमित्ताने पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात आणखी 50 हजार झाडे चाफ्याच्या फुलांनी बहरणार आहेत.