Karad Accident News | कराडमध्ये रक्ताचा सडा! रिक्षा आणि एसटीची समोरासमोर भीषण धडक; चिमुरडीसह दोन महिला जखमी
ढेबेवाडी मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात!
कराड : ढेबेवाडी मार्गावर वाहतूकवळवण्यात आलेल्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर घहक होऊन रिक्षाचालकासह दोन महिला व एक लहान मुलगी जखमी झाली. यामध्ये रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना दुपारी सुमारे सव्वा दोनच्या सुमारास सुमन मेडिकलसमोर घडली. सूर्यकांत जयसिंग जमाले (वय ५७, रा. मुंढे, ता. कराड) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून, अन्य जखमी महिलांची नावे समजू शकली नाहीत.एसटी महामंडळाची बस (क्रमांक याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ बीटी ३३१०) ही ढेबेवाडीवरून कराडकडे येत होती. आगाशिवनगर येथील जिल्हा परिषद कॉलनीजवळ पाईपलाईनच्या खुदाईमुळे वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एकाच मार्गावर सुरू होती.
दरम्यान, देवकर कॉलनीकडे प्रवासी सोडण्यासाठी जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच ५० एम ७९२९) भरधाव वेगात समोरून येत होती.रिक्षाचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षा थेट एसटी बसवर आदळली. धडक इतकी जबर होती, की रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनीतत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमीना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला तसेच दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, रस्त्यावरील कामांमुळे वाहतूक वळवण्यात येत असताना योग्य खबरदारी घेणे आणि वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.