उद्या सावंतवाडीत 'रक्तदाता सन्मान सोहळा'
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
रक्तदान चळवळीत अल्पावधीतच महत्त्वपूर्ण योगदान देत असलेल्या ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्यावतीने रक्तदात्यांचा 'रक्तदाता सन्मान सोहळा' रविवार २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील रविंद्र मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस, तर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले, गोवा येथील सार्थक फाउंडेशनचे संयोजक सुदेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.संस्थेचे रक्तदाते एका कॉलवर कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र, ऐन पावसात, प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पदरमोड करुन रक्तदान करण्यासाठी देवताप्रमाणे सज्ज असतात. रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या संघटनेचे सदस्य आणि रक्तदाते अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनताना सामाजिक भान ठेवून रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. अशा असंख्य रक्तदात्यांची संस्था असून सांघिक कार्याने रक्ताची गरज पूर्ण करून रुग्णांचे प्राण वाचविले जातात. समाजाला अभिप्रेत असे सत्कार्य या संस्थेच्यावतीने केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले.या कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, सत्कारमूर्ती, नियमित रक्तदाते यानी उपस्थित राहण्याचे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव बाबली गवंडे, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, उपाध्यक्षा मिनल सावंत,खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सदस्य बाळकृष्ण राऊळ, सचिन कोडये, दिनेश गावडे, सदस्य जितेंद्र पंडित यांनी केले आहे.