रक्तदानाला चळवळीचे स्वरूप येण्याची गरज
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी यांचे प्रतिपादन
मनीषा सुभेदार /बेळगाव
रक्त हा असा एकमेव घटक आहे की तो मानवाच्या शरीरामध्ये तयार होतो. रक्त कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्वही वाढले आहे. रक्तदान करण्यामध्ये आज अनेक लोक पुढाकार घेत आहेत. परंतु अद्याप त्याला चळवळीचे स्वरुप येण्याची गरज आहे. रक्ताचे महत्त्व, रक्तदान कसे करावे, याबद्दल केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी यांच्याशी संवाद साधला. मानवाच्या शरीरामध्ये साधारण 5 ते 7 लिटर रक्त असते. रक्तवाढीसाठी पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यांसह सकस आहार महत्त्वाचा आहे. रक्ताची गरज प्रामुख्याने गर्भवतींना प्रसुतीवेळी अधिक रक्तस्त्राव झाल्यास, कर्क रुग्णांना तसेच थेलेसेमियाच्या रुग्णांना प्रामुख्याने भासते. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज भासू शकते. डॉ. विरगी यांच्या मते वय वर्षे 18 ते 60 या वयोगटातील लोकांना रक्तदान करता येते. त्यांचे वजन 45 किलोपेक्षा अधिक असावे. त्यांचे हिमोग्लोबीन 12.5 च्यावर असायला हवे. एचआयव्ही, हिपेटायटीस बी असे कोणतेही आजार त्यांना नसावेत. शिवाय त्यांच्यावर एखादी शस्त्रक्रिया झालेली असल्यास सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा. याशिवाय गर्भवती, मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना रक्तदान करता येत नाही किंबहुना त्यांचे रक्त स्वीकारले जात नाही.साधारण एका व्यक्तीच्या शरीरातून 350 ते 450 मिली रक्त घेण्यात येते. तत्पूर्वी काविळ, टायफॉईड, एचआयव्ही, व्हीडीआरएल व मलेरिया पॅरासाईट याची चाचणी केली जाते. शिवाय रक्तगटही काढून दिला जातो. बाहेर या सर्व तपासणीसाठी शुल्क द्यावे लागते. मात्र, रक्तदानाच्या निमित्ताने या सर्व चाचण्या विनामूल्य होतात, हे महत्त्वाचे.
वर्षभरातील ब्लड बँकेमध्ये संकलित झालेल्या रक्ताचा तपशील
- एकूण रक्त 16,565 युनिट
- स्वेच्छेने केलेले रक्तदान 15,700
- बँकेने घेतलेली शिबिरे 113
- एचआयव्ही पॉझिटिव्ह 16
- हिपेटायटीस बी 4 टक्के
- हिपेटायटीस सी 8 टक्के
- व्हीडीआरएल 0.4 टक्के
- मलेरियन पॅरासाईट 0 टक्के
- बँकेने पुरविलेले रक्त 30 हजार व्यक्ती
- रक्तपेढी जाने. ते डिसें.-23 जाने. ते जून-24 रक्तदान शिबिरे
- केएलई ब्लडबँक 16,565 (स्वेच्छेने 15,700) - 113
- बिम्स 7,550 3,630 100 हून अधिक
- बेळगाव ब्लडबँक 7,000 2,500 25 ते 30
- महावीर ब्लडबँक 3,192 1,078 30
रक्तगटाचा शोध
नेमका रक्तगट कळाल्याने वैद्यकीय क्षेत्राला हे संशोधन वरदानच ठरले. डॉ. कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. 14 जून हा त्यांचा जन्मदिवस. तोच दिवस रक्तदान दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा केला जातो.
दरवर्षी रक्तदान शिबिरे
याशिवाय दरवर्षी 27 फेब्रुवारी या भाषा दिनादिवशी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी रक्तदान शिबिराचे आयोजन करते. तसेच मारवाडी युवा मंच, जितो, रोटरी, लायन्स, इनरव्हील, शनैश्चर मंडळ यासह शहरातील असंख्य संस्था दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात.