ब्लॉकचेन तंत्रज्ञान शेतीसाठी महत्त्वाचा आधार बनणार
कोल्हापूर / संतोष पाटील :
महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात, जिथे शेतकरी अजूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत, तिथे शेती उत्पादनांच्या पुरवठा साखळीतील पारदर्शकता आणि विश्वास वाढवणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. ग्राहकांची जाणीव वाढत आहे, निर्यात धोरणे अधिक काटेकोर होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी डिजिटल परिवर्तनावर भर दिला आहे. अर्थसंकल्पातील ब्लॉकचेन तंत्रज्ञान शेतीसाठी महत्त्वाचा आधार बनणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार कोटींचे विशेष बजेट शेतीतील बाजार व्यवस्था सुधारण्यासाठी आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पश्चात-हंगामी व्यवस्थापनासाठी जाहीर केले आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा, हळद यांसारख्या राज्याच्या महत्त्वाच्या निर्यातयोग्य पिकांमध्ये ट्रेसबिलिटी (मागोवा घेता येणारी साखळी) प्रणालीस प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक प्रकल्प हाती घेतले जात आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाने ग्राहकांचा आणि निर्यातदारांचा विश्वास वाढतो. विशेषत: युरोपीय देश जिथे अन्नातील रसायनांची मर्यादा, ऑरगॅनिक सर्टिफिकेट्स आणि ट्रेसबिलिटी आवश्यक असते, तिथे नाशिक किंवा सांगलीतील उत्पादक त्यांचे उत्पादन पारदर्शकपणे सादर करू शकतात. परिणामी, निर्यात नाकारली जाण्याचा धोका कमी होतो आणि चांगले दर मिळतात.
घरीही ग्राहक आता शाश्वत व सेंद्रीय उत्पादनांकडे वळत आहेत. उदा. हिंगोलीतील हळद उत्पादक सहकारी संस्था जर ब्लॉकचेनद्वारे त्यांची सेंद्रीय प्रक्रिया प्रमाणित करत असेल, तर ती बाजारात ट्रेसबिल आणि दर्जेदार म्हणून ओळखली जाऊ शकते आणि अधिक दर मिळू शकतो. शासनाच्या दृष्टीनेही ब्लॉकचेनचा वापर उपयुक्त ठरतो. यंदाच्या अर्थसंकल्पात अनुदान वाटपातील अपारदर्शकतेवर चिंता व्यक्त केली होती. शेतजमिनीचे अधिकार, पीक विमा, खत वापर यासारख्या गोष्टी ब्लॉकचेनवर नोंदवल्या गेल्या, तर अनुदाने थेट आणि पारदर्शकपणे पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील. अर्थात, अजूनही काही अडथळे आहेत.
ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा, डिजिटल साक्षरतेचा अभाव, आवश्यक आधारभूत सुविधा कमी आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचे उदाहरण दिसते. मात्र, राज्य सरकारने जाहीर केलेल्या 100 तालुक्यांतील डिजिटल अॅग्रिकल्चर हब्सची योजना योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. ब्लॉकचेनमुळे महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात विश्वासार्हता, ट्रान्सपरन्सी आणि उत्पन्नवाढ शक्य आहे. 2025-26 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगतपणे, या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडू शकतो. हा सकारात्मक बदल होण्यासाठी सरकारी धोरण, खासगी गुंतवणूक आणि शेतकऱ्यांची भागीदारी या त्रिसूत्रीची गरज असल्याचे मत डॉ. चेतन नरके यांनी व्यक्त केले.
- ब्लॉक चेन म्हणजे काय?
ब्लॉक चेन म्हणजे एक विकेंद्रीकृत आणि छेडछाड अक्षम डेटा रेकॉर्ड प्रणाली, जिथे शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि शासकीय यंत्रणा एकाच साखळीत सुरक्षित पद्धतीने डेटा नोंदवू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या द्राक्षाच्या वेलाचे रोपण कधी झाले, कोणते खत वापरले, कधी काढणी झाली, वाहतूक कशी झाली, हे सर्व टप्पे एकाच ब्लॉक चेनवर डिजिटल स्वरूपात आणि कायमस्वरूपी नोंदवले जाऊ शकतात. याचा मोठा फायदा शेतीसह दुग्ध व्यवसायात होणार आहे.
- डॉ. चेतन अरुण नारके, आर्थिक सल्लागार आणि तंत्रज्ञान तज्ञ