संचालकांकडून उत्पन्न वाढीची नाकाबंदी : बाजार समितीमधील चित्र
धान्य बाजारातील कर वसुली नाका बंद करण्याचा हालचाली : उत्पन्न वाढीबाबत नेत्यांनी दिलेला आदेश ध्याब्यावर
धीरज बरगे/कोल्हापूर
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना राबवा अशा सूचना नेतेमंडळी करत असताना दूसरीकडे कर वसुली नाके बंद करुन संचालक मंडळाडून एकप्रकार समितीच्या उत्पन्न वाढीचीच नाकाबंदी केली जात आहे. समितीची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी नेते प्रयत्नशील असताना संचालकांकडून नेत्यांचा उत्पन्न वाढीचा आदेश धाब्यावर बसवला जात आहे. कर वसुली नाके बंद झाल्यास समितीच्या कारभारामध्ये पुन्हा अनागोंदी सुरु होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम समितीच्या आर्थिक स्थितीवर होणार असून याचा फटका कर्मचारी वर्गाला बसणार आहे.
बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतुने माजी अध्यक्ष दत्तात्रय साळोखे यांनी कांदा बटाटा मार्केटमध्ये, संभाजी पाटील-कुडीत्रेकर यांनी फळ व भाजीपाला मार्केटमध्ये तर अशासकीय मंडळाचे अध्यक्ष असतान माजी आमदार के. पी. पाटील यांनी धान्य मार्केटमध्ये कर वसुली नाका सुरु केला. कर वसुली नाका सुरु झाल्यानंतर समितीमध्ये होणाऱ्या मालाच्या आवक-जावकमध्ये पारदर्शकता आली. परिणामी समितीच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली. मात्र आता हेच कर वसुली नाके एक एक करुन बंद करण्याची हालचाल विद्यमान संचालक मंडळाकडून सुरु आहे.
55 लाखांचे उत्पन्न दोन कोटी रुपयांवर
कांदा बटाटा मार्केटमध्ये कर वसुली नाका सुरु होण्यापुर्वी सुमारे 55 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण नाका सुरु झाल्यानंतर हेच उत्पन्न सुमोर दोन कोटी रुपयांच्यावर गेले. त्यामुळे कर वसुली नाक्यांमुळे समितीचे उत्पन्न मोठ्याप्रमाणात वाढल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कर वसुली नाके बंद करण्याचा चुकीचा निर्णय संचालक मंडळ घेत असल्याची चर्चा दबक्या आवाजात समितीमध्ये सुरु आहे.
तर भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केटचाही नाका बंद
धान्य मार्केटमधील नाका बंद करण्यासाठी दोन संचालकांचा पुढाकार आहे. धान्य नाका बंद करुन पुढील टप्प्यात कांदा-बटाटा मार्केटमधील नाका बंद करण्याचा डाव आहे. हे दोन नाके बंद झाल्यास फळ, भाजीपाला मार्केटमधील व्यापारीही नाका बंद करण्यासाठी उठून बसणार आहेत. सगळेच नाके बंद झाल्यास समितीचे आर्थिक उलाढाला कशावर चालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्पन्न वाढीसाठी कोणतेच प्रयत्न नाहीत
संचालक मंडळ अस्तित्वात येवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप उत्पन्न वाढीसाठी कोणताच प्रयत्न झालेला नाही. उत्पन्न वाढवणे दूर पण सध्याचे मिळणारे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी तरी संचालक मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र नाके बंद करुन येथून कमी होणारे उत्पन्न समिती कोणत्या मार्गाने वाढविणार याचाही विचार होणे आवश्यक आहे.
मग पन्नास लाख ज्यादा देणार कसे?
धान्य मार्केटमधील कर वसुली नाका बंद करा करातुन मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 50 लाख रुपये ज्यादा देण्याची तयारी येथील व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे. पन्नास लाख रुपये ज्यादा देणार मग नाका बंद करुन तोट्यातील व्यवहार व्यापारी कसा करतील, अशीही चर्चा समितीमध्ये सुरु आहे.
शेतकरी संघाप्रमाणे बाजार समितीचाही आढावा घ्या
शेतकरी संघ निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल झाले आहे. पॅनेलचा नुकताच मेळावा झाला. मेळाव्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकरी संघाला उभारी देण्यासाठी आणि संचालक मंडळाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी दर दोन ते तीन महिन्यांनी नेत्यांनी संघाचा आढावा घ्यावा, अशी सूचना केली. बाजार समितीमधील सध्याच्या हालचाली पाहता आता नेत्यांनी आता बाजार समितीमधील संचालक मंडळाच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे आहे. समितीचा मुख्य आर्थिक स्त्राsत असलेल्या कर वसुली नाक्यावर घाव घालण्याचे काम सध्या सुरु आहे. नाके बंद झाल्यास समितीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. त्यामुळे समितीचा शेतकरी संघ होण्याअधी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.
बहुमताने निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी
धान्य मार्केटमधील कर वसुली नाका बंद करण्याबाबात संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. चर्चेमध्ये बहुमताने जो निर्णय होईल, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.
- भारत पाटील-भुयेकर, सभापती, कोल्हापूर बाजार समिती.