मराठी राजभाषेसाठी 26 पासून राज्यात प्रखंड मेळावे
मराठी राजभाषा निर्धार समितीचा निर्णय : वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बैठक
पणजी : गेली 40 वर्षे मराठीवर झालेल्या आणि आता होत असलेल्या अन्यायाबाबत संपूर्ण गोव्यात ‘जनजागरण अभियान’ शनिवार दि. 26 एप्रिलपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गोमंतक मराठी अकादमीच्या पर्वरी येथील मराठी भवनमध्ये मराठी राजभाषा निर्धार समितीच्या सुकाणू संच बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे संचालन राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर आणि ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनी केले. या जनजागरण अभियानाचा श्रीगणेशा शनिवार दि. 26 एप्रिलपासून मांद्रे प्रखंडातून करण्याचे ठरले आहे.
तीन महिन्यांत 18 ‘प्रखंड मेळावे’
अभियान व्यापक करण्यासाठी संघटनात्मक रचना 12 सरकारी तालुक्यांऐवजी, भौगोलिकदृष्ट्या सोयीचे अशा 18 प्रखंडांची रचना करण्यात आली आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात सर्व 18 प्रखंडात मराठीप्रेमींचे ‘प्रखंड मेळावे’ आयोजित करण्यात येणार आहेत. प्रखंड मेळाव्यांमध्ये सर्वसमावेशक अशा व्यापक ‘प्रखंड समित्या’ स्थापन करण्यात येतील.
आवाहन पत्रांचे होणार वितरण
या प्रखंड मेळाव्यातच आंदोलनाची कृती-योजना, जी पहिल्या टप्प्यात प्रखंड स्तरावर कार्यान्वित होईल ती जाहीर करण्यात येईल. निर्धार मेळाव्यात सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या ‘आवाहन पत्रां’चे वितरण प्रखंड मेळाव्यांतून सुऊ करण्यात येईल. सुकाणू बैठकीत मराठी राजभाषा निर्धार समितीची एकंदर भूमिका आणि वैचारिक धोरण काय असावे, याबद्दल चर्चा होऊन त्यात प्रारंभी सुभाष वेलिंगकर यांनी सूत्रपात केला. प्रदीप घाडी आमोणकर, नारायण महाले, डॉ. अनुजा जोशी, विजय नाईक, गोविंद देव, गो. रा. ढवळीकर, प्राचार्य गजानन मांद्रेकर, अनुराधा मोघे, गुऊदास सावळ, नितीन फळदेसाई यांनी सहभाग घेतला. सामूहिक पसायदान होऊन बैठकीची सांगता झाली.