शहरातील रस्त्यांबाबत ब्लॉक काँग्रेस नागरिकांसोबत
आराखडा बदलण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू : खानापूर ब्लॉक काँग्रेसकडून ग्वाही
खानापूर : एकात्मक विकास योजनेतून राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली आहे. रुमेवाडी ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याची रुंदी तसेच नदी पुलापासून ते मऱ्याम्मा मंदिरपर्यंत रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत काँग्रेस नागरिकांच्या हिताचाच निर्णय घेणार आहे. तसेच नागरिकांच्या मागणीनुसारच हा रस्ता करण्यात यावा, भविष्याचा विचार करता रस्त्याची रुंदी वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आराखड्यात आवश्यक तो बदल आणि निधी मंजुरीसाठी ब्लॉक काँग्रेस नागरिकांच्या मागणीनुसार शासनदरबारी आराखड्यात बदल आणि निधी मंजुरीसाठी निधी पाठपुरावा करेन, असे स्पष्टीकरण ब्लॉक काँग्रेसच्यावतीने देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश जाधव, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, अर्बन अध्यक्ष महांतेश राऊत यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
करंबळ क्रॉस ते राजा टाईल्सपर्यंतचा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत होत्या. मात्र महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यासाठी 14 कोटीचा निधी मंजूर करून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे. करंबळ क्रॉस ते रुमेवाडी नाक्यापर्यंत 5 मीटरचा रस्ता काँक्रीटीकरण केला आहे. रस्त्यावरुन एकाचवेळी दोन मोठी वाहने जावू शकत नसल्याने नागरिकांतून या रस्त्याच्या रुंदीबाबत आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. या रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र आराखड्यानुसार दोन्ही बाजूला मुरूम टाकण्यात येत आहे. मात्र भविष्यात हा रस्ता खचण्याचा धोका संभवत असल्याने या रस्त्यावरुन वाहतुकीस धोका निर्माण होणार आहे. यासाठी रस्त्याची रुंदी वाढविण्याचा मागणीचा विचार करणे गरजेचे आहे.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने राजकारण बाजूला ब्लॉक काँग्रेसने सर्वपक्षीय शिष्टमंडळालाही पाठिंबा देवून वेळोवेळी भेटीगाठी आणि चर्चेत सहभागी झाली आहे. विकासात राजकारण न आणता सर्वांनी भविष्याचा विचार करून तसेच इतर शहरांच्या विकासाच्या तुलनेने खानापूर शहराचा विकास झालेला नाही. यासाठी हीच योग्य वेळ आहे. यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला सारुन शहराच्या विकासासाठी आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या आराखड्यात बदल करण्यासाठी आणि वाढीव निधी मंजूर करण्यासाठी संबंधित खात्याकडे आणि शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी खानापूर ब्लॉक काँग्रेस नागरिकांबरोबर राहील, अशी ग्वाही दिली.
रस्त्याची रूंदी आताच वाढवण्याची गरज
नदी पुलापासून ते मऱ्याम्मा मंदिरापर्यंत आराखड्यानुसार रुंदी ठेवण्यात यावी, त्यामुळे भविष्यात शहराचा विस्तार आणि वाहनांची वाढणारी संख्या, तसेच या परिसरात असणारी शाळा, कॉलेजीस, शासकीय कार्यालये, बस्थानक, रेल्वेस्थानक याचा विचार करता रस्त्याची रुंदी आताच वाढवण्याची गरज आहे. तसेच राजा शिवछत्रपती स्मारकाचा विस्तार करणे गरजेचे आहे. यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राजा छत्रपती चौकाचा विस्तार केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार सध्याच्या आराखड्यात बदल करून नव्याने निधी मंजूर करणे गरजेचे आहे. यासाठी शासनदरबारी ब्लॉक काँग्रेसकडून निश्चित पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.