For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पदवी प्रमाणपत्र सुरक्षेसाठी ‘ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी’

11:21 AM Jan 17, 2025 IST | Radhika Patil
पदवी प्रमाणपत्र सुरक्षेसाठी ‘ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी’
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे : 

Advertisement

विद्यापीठांचे नकली प्रमाणपत्र वापरून शिक्षण किंवा नोकरी मिळवण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी’ वापरण्याचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. जेणेकरून प्रमाणपत्रांची वैधता तपासणे आणि खोट्या प्रमाणपत्रांच्या वापरास आळा घालणे सहज शक्य होणार आहे. तसेच सध्या प्रमाणपत्रांसाठी वापरला जाणारा कागद फाटू शकतो म्हणून भविष्यात प्रमाणपत्रांसाठी ‘नॉन टेरेबल पेपर’ वापरून त्याची कालमर्यादा वाढवण्याचा प्रयत्न परीक्षा विभाग करणार आहे.

राज्यभरासह शिवाजी विद्यापीठातील नकली पदवी प्रमाणपत्रांचा वापर करून शिक्षण किंवा नोकरी मिळवण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. संबंधितांवर विद्यापीठ प्रशासनाने कायदेशीर कारवाईदेखील केली आहे. तरीदेखील विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांना हताशी धरून अर्थकारणाच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार काही केल्या थांबत नाही. यातून विद्यापीठाचीच सर्वत्र बदनामी होते. या गोष्टी लक्षात आल्याने शिवाजी विद्यापीठ पदवी प्रमाणपत्राच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी’ वापरली जाणार आहे. त्यादृष्टीने परीक्षा विभागातील अधिकारी कामाला लागले आहेत.

Advertisement

आतापर्यंत परीक्षेत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा सुरळीत करण्याचा विद्यापीठाने वारंवार प्रयत्न केला आहे. ऑनलाईन प्रवेशासह परीक्षा अर्ज भरणे, पेमेंट गेटवेच्या माध्यमातून शुल्क भरणे, एसआरपीडीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवणे, पेपर सेटींगही ऑनलाईन पध्दतीने करणे. आता ऑनस्क्रिन पेपर तपासणीचा प्रयोगही परीक्षा विभाग यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यापुढे जाऊन पदवी प्रमाणपत्राची माहिती आणि प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठवले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र क्यूआर कोड तयार करून दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यापीठाच्या तांत्रिक प्रगतीचे कौतुक एका राज्यभरातील विद्यापीठांच्या बैठकीत राज्यपालांनी केले असून इतर विद्यापीठांना अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे वारंवार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न विद्यापीठ करीत असून आता पदवी प्रमाणपत्राच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी’ वापर करण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे.

  • दुबार पदवी प्रमाणपत्र मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार

भविष्यात तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर पदवी प्रमाणपत्र फाटू नये, अनेक वर्षे सुरक्षित राहण्यासाठी ‘नॉन टेरेबल पेपर’चा वापर करून पदवी प्रमाणपत्र तयार केले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढी वर्षे हे प्रमाणपत्र आपल्या फाईलमध्ये सुरक्षित ठेवता येईल. तसेच प्रमाणपत्र खराब झाले म्हणून दुबार पदवी प्रमाणपत्र मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होईल. या पेपरमुळे कागदपत्रांची कालमर्यादा वाढून कायमस्वरूपी रेकॉर्ड राहण्यासाठी मदत होणार आहे.

  • विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती नमूद

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती म्हणजे नाव, पीएनआर नंबर, आधारकार्ड नंबर, एबीसी नंबर आदी माहिती नमूद केली आहे. त्यामुळे ‘ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी’ चा वापर करून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची वैधता तपासून बनावट प्रमाणपत्रे शोधणे व आळा घालण्यास मदत होणार आहे.

  • पदवी प्रमाणपत्रावर सिक्युरिटी कोड अद्यावत

शिवाजी विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्रावर सिक्युरिटी कोड अद्यावत केले आहेत. परंतु पदवी प्रमाणपत्राच्या सुरक्षेसाठी पुढच्या दीक्षांत समारंभापासून ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे.

                   डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)

Advertisement
Tags :

.