For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देवांना त्यांचा वाटा अर्पण करून उरलेले जो खातो तो धन्य होतो

06:16 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
देवांना त्यांचा वाटा अर्पण करून उरलेले जो खातो तो धन्य होतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, माणसाने स्वधर्माचे आचरण केलं तर देव संतुष्ट होतील आणि त्याला हवे ते देतात. असे एकमेकांचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल, तेंव्हा तो जे करेल ते सहजच सिद्धीस जाईल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ह्यात एक पथ्य मात्र पाळायला हवं ते म्हणजे, देवांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवांनी दिलेल्या वस्तूंचा एकट्याने उपभोग न घेता देवांचा वाटा त्यांना समर्पित करावा. असे जो करणार नाही तो चोर होय. जो स्वधर्माचे पालन करणार नाही त्याला मोठमोठे अपाय होतात. त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होते. त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगू शकत नाही. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही त्याप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला, तर सुखाचा प्रकाश नाहीसा होऊन दु:खाचा अंध:कार पसरतो. जो स्वधर्माचा त्याग करतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. नेमून दिलेल्या कामाचा त्याग करणाऱ्याला इशारा देताना ते म्हणाले, स्वधर्माचा जो त्याग करेल, त्याला काळच शिक्षा करेल आणि हा चोर आहे, असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्र झाली की, पिशाच्ये स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे सर्व पापे अशा माणसाला पछाडतात. त्रिभुवनातील विविध दु:खे, पातके, सर्व दारिद्र्यो, स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाच्या वाट्याला येतात. त्याने कितीही आक्रोश केला, तरी कल्पाच्या अंतापर्यंतदेखील त्याची त्यातून सुटका होत नाही. म्हणून स्वधर्म आचरण सोडू नये आणि इंद्रियांना भलत्याच मार्गाने जाऊ देऊ नये. ज्याप्रमाणे एखाद्या माश्याला पाण्याचा वियोग झाला की, त्याच क्षणी मरण येते त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो, म्हणून त्याने स्वधर्म कधीही सोडू नये. तुम्ही सर्वांनी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्मे करावीत, हे मी पुन: पुन: सांगत आहे.

इथे माणसाला असे वाटू शकते की, त्याने स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या वस्तूंचा उपभोग घेण्यात गैर काय आहे? मी चोर कसा? त्याचे उत्तर असे की, मनुष्य हा ईश्वराच्या हातातले बाहुले असल्याने तो स्वत: कधीही कर्ता नसतो. ईश्वर त्याच्या हातून कार्य करून घेत असल्याने त्या कार्याचे फळही वास्तविक पाहता त्याच्याच मालकीचे असते म्हणून त्याचा उपभोग स्वत: घेण्याची इच्छा होणे आणि तसा तो घेणे ही चोरीच ठरते.

Advertisement

पुढील श्लोकात ब्रह्मदेवानी प्रजेला सांगितलेले भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, स्वधर्माचे पालन करून जे फळ मिळेल त्यातून याचक, गरजू ह्यांना काही भाग देऊन उर्वरित भाग जे स्वत:च्या चरितार्थासाठी जे वापरतात ते महान पुरुष सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात आणि जे स्वत:साठीच ते धन वापरतात ते अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात.

यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळिती । रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती ।। 13 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो, गुरूंची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, ब्राम्हणांची सेवा करतो आणि पितरांच्याकरिता श्राद्धादि नैमित्तिक कर्मे करतो तो स्वधर्माचे पालन करत असतो. असे करून उर्वरित धन सुखा-समाधानाने जो कुटुंबासाठी वापरतो त्याची सर्व पापे नाहीशी होतात. ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोग नाहीसे होतात, त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो सेवन जो करतो त्याची सर्व पातके नाहीशी होतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.