For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धन्य धन्य हो प्रदक्षिणा

06:14 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
धन्य धन्य हो प्रदक्षिणा
Advertisement

सुप्रसिद्ध विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी त्यांच्या आणि नातीच्या संवादातून उगम पावलेल्या तत्त्वज्ञानाचा एक अनुभव लिहिला आहे. वृद्धत्वाकडे झुकलेल्या आपल्या दुर्गु आजीला स्वत:च्या कानात घातलेले चमचमते कानातले दाखवून ती चिमुरडी म्हणाली, ‘बघ माझ्या आईने दिले.’ स्वत:चे ओकेबोके कान दाखवून दुर्गाबाई त्या अबोध बालिकेला म्हणाल्या, ‘तुझ्या आईला सांग ना मला पण आणून द्यायला असे छान कानातले.’ तेव्हा ती म्हणाली, ‘तू नवी आई आण ना.’ दुर्गाबाई म्हणतात, मी जीवनाच्या अगदी काठाशी पोहोचले अन् नव्या आईची वाट बघू लागले. जन्म ते मृत्यू या प्रदक्षिणेच्या टोकाशी पुन्हा उगम आहेच. कवी ग्रेस म्हणतात, ‘झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया’.. मातीतून उगवून पुन्हा मातीतच विलीन होणे अशा जिवाच्या किती प्रदक्षिणा होतात कोण जाणे. आद्य शंकराचार्य म्हणतात, ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे बहु दुस्तारे, कृपयोपारे पाहि मुरारे’. जोपर्यंत जिवाचा प्रवास परमात्म्याच्या उगमापर्यंत जाऊन त्यात विरघळून जात नाही तोपर्यंत परिभ्रमण अपरिहार्य आहे. अस्तित्वाचा विलोप झाला की मोक्षापर्यंत जाऊन जन्ममरणाची प्रदक्षिणा पूर्ण होते. विराम पावते. परंतु हे घडते तरी कसे?

Advertisement

रामायणामध्ये एक प्रसंग आहे. मिथिलानगरीत आईच्या सांगण्यावरून सीता उद्यानातील गौरीपूजनासाठी देवीच्या देवळात आली होती. त्याचवेळी विश्वामित्रांच्या आज्ञेने श्रीराम, लक्ष्मण पूजेसाठी फुले तोडण्याच्या निमित्ताने त्या उद्यानात आले होते. भावभक्तीने गौरीचे पूजन करून सीता देवळाला प्रदक्षिणा घालायला लागली आणि अकस्मात समोर तिला परमात्मास्वरूप श्रीरामांचे दर्शन झाले. अनुपमेय सौंदर्याने नटलेल्या श्रीरामांना बघताच ती तिथेच थांबली. स्तब्ध झाली. सगळ्या इंद्रियांची शक्ती तिच्या जणू डोळ्यातच सामावली. जगाचे सगळे सौंदर्य तिच्या डोळ्यात येऊन बसले. देवळाला घालत असलेल्या तिच्या प्रदक्षिणा थांबल्या. यावर संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘ज्या श्रीरामांच्या नुसत्या नामस्मरणाने जन्ममृत्यूच्या मोठ्या प्रदक्षिणा थांबतात त्याला सगुण रूपात प्रत्यक्ष बघितल्यावर देवळाभोवतीच्या छोट्या प्रदक्षिणा थांबल्या तर त्यात नवल ते काय?’ रामनामाचे स्मरण केल्याने जन्ममृत्यूची प्रदक्षिणा पूर्ण होते. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात, ‘पृथ्वीचिया पैसारा,   माजी घडी न लगता धनुर्धरा, एकेची उ•ाणे साताही सागरा, प्रदक्षिणा करी जो । तया वहिलीया गतिमंता, आत पवनु तो मी पांडूसुता,  शस्त्रधरा समस्ता-, माजी श्रीराम तो मी?’  पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षणदेखील न लागता अर्जुना, एका उडीसरशी पृथ्वीच्या विस्तारातील सातही समुद्रांना जे प्रदक्षिणा करतात त्यात अत्यंत वेग असलेल्यांमध्ये जो वारा आहे, अर्जुना तो माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे.

प. पू. मामा देशपांडे यांचे परमशिष्य पू. शिरीषदादा कवडे म्हणतात, ‘मंदिरामध्ये देवप्रदक्षिणा करण्याचे कारण म्हणजे मंदिराच्या गर्भगृहातील प्राणप्रतिष्ठित देवतेच्या ठिकाणी जे चैतन्य असते ते वातावरणातील प्राणाचे आकर्षण करीत असते. त्यामुळे देवतेच्या सभोवताली, परिसरात प्राण शुद्ध झालेले असतात. प्रदक्षिणा ही गाभाऱ्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने करायची असते. प्रदक्षिणा करताना गाभाऱ्यातील देवता प्राण खेचते आणि प्रदक्षिणाकाळात प्राण काही प्रमाणात शुद्ध करून देते. शुद्ध प्राण असलेल्या परिसरातून फिरताना शरीरही ताजेतवाने होते.’

Advertisement

देवीला एक, सूर्याला सात, गणपतीला तीन, विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्या आणि शिवाला अर्ध प्रदक्षिणा करावी असे धर्मशास्त्र सांगते. वराहपुराणात प्रदक्षिणामहात्म्य सांगितले आहे. जे भक्तीयुक्त अंत:करणाने देवाला प्रदक्षिणा करतात त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला जातात. श्रीक्षेत्र आळंदी येथे असलेल्या सुवर्णपिंपळवृक्षाला माऊलींच्या मातोश्रींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या. औदुंबर, वड, पिंपळ या वृक्षांना प्रदक्षिणा घालतात. वृक्ष हे भूमीमधील ऊर्जा शोषून सावली, फळे, फुले देत असतात. वृक्षप्रदक्षिणेमुळे पृथ्वीऊर्जेचा लाभ होतो. पृथ्वीतत्त्वाच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे वृक्षप्रदक्षिणा. जीव जेवढा भूमीशी जोडला जातो तेवढा तो स्थिर आणि शांत होतो. नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. नर्मदेचा प्रवाह कुठेही न ओलांडता उगमापासून मुखाकडे चालत जायचे आणि त्याच मार्गाने परत यायचे. नर्मदा सतत डोळ्यासमोर असावी असाही दंडक आहे. नर्मदे हर असा घोश करीत प्रदक्षिणा करणारे भक्त त्यावेळी केवळ नर्मदा मातेचे पुत्र असतात. नर्मदेचे अस्तित्व, तिची साक्ष आणि तिचे अलोट प्रेम यात बुडून स्वअस्तित्वाचा पुरता लोप झालेल्या भक्तांच्या सहवासात गेल्यावर कळते की नर्मदा मातेची जलऊर्जा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवून मोक्षाच्या वाटेवर आणून सोडते.

सर्वात अनोखी आहे ती ग्रंथप्रदक्षिणा. ऐश्वर्यवती श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तांची वंदनभक्ती निराळी आहे. श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पाटावरती आसनावर ठेवून पारायण सुरू करायचे. एक ओवी वाचून झाली की ग्रंथाला उदबत्ती ओवाळून खडीसाखरेचा खडा नैवेद्यासाठी ठेवून ग्रंथाला प्रदक्षिणा करायची आणि नंतर पुढची ओवी वाचायची. ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणतात. ती मनात रुजल्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी प्रत्येक ओवीला प्रदक्षिणा करणारे भक्त धन्य म्हटले पाहिजेत. प्रदक्षिणा म्हणजे विश्वातील गतीशी समरस होण्याचा छोटासा प्रयत्न. मूर्ती आणि रत्न या दोन कला समजून घेण्यासाठी प्रदक्षिणा महत्त्वाची. मूर्ती व त्यातील गतिमान शक्ती समजून घेता यावी म्हणून प्रदक्षिणा घालतात. अर्थात देवळाला. याच शक्तीचे सूक्ष्म रूप म्हणजे सद्गुरूंनी दिलेला मंत्र. तोही इंद्रियाद्वारे फिरता, गतिशील हवा. तेव्हाच तो कळेल आणि त्याची प्रभासुद्धा फाकेल. ती शक्ती धारण करता येईल. सद्गुरूवाचुनी दुसरे दैवत नाही. सद्गुरूंची प्रदक्षिणा ही सर्वात श्रेष्ठ आहे. ‘धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची’ या लोकप्रिय गीतात म्हटले आहे की, ‘पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी.’ सद्गुरूंचा महिमा तेच जाणू शकतात. ‘अनुभव ते जाणती जे गुरुपदाचे रहिवासी’.

सूर्य, चंद्र, पृथ्वी, ऋतू... सारे प्रदक्षिणेत मग्न आहेत. जगाला त्यामुळे गती आहे. गती जगण्याचा आधार आहे. गतीमध्ये सामील होऊन स्थिर राहणे ही प्रदक्षिणेची पूर्णता आहे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.