सोमालियांमध्ये अनेक ठिकाणी स्फोट, 19 ठार
अल-शबाबने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था /मोगादिशू
सोमालियाच्या दोन शहरांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये कमीत कमी 19 जण मारले गेले असून 23 जखमी झाले आहेत. मार्का या शहरात एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोट घडवून आणला, यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. दुसऱया घटनेत अफगोय शहरात दोन स्फोट झाले आणि यात 7 जण मारले गेले तर 18 लोक जखमी झाले आहेत.
अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. मार्का शहरातील प्रशासकीय मुख्यालयाबाहेर पहिला स्फोट झाला. या स्फोटाद्वारे महापौर अब्दुल्लाही अली वाफो यांना ठार करण्यात आले आहे. आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी युक्त जॅकेट परिधान केले होते अशी माहिती गव्हर्नर इब्राहिम अदन अली नाजा यांनी दिली. अफगोय शहरात एका बाजारपेठेत दोन स्फोट झाले आणि यात 7 जण मारले गेले आहेत. मृतांमध्ये 2 सैनिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमालियात इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे हा अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा उद्देश आहे.